Join us  

LMOTY 2018: 'तुमच्या आणि अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख जमा झाले का?'; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 12:52 PM

संजय राऊत यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.

मुंबई: तुमच्या आणि अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले का?, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. संजय राऊत यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी चाणाक्षपणे उत्तरं दिली. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचं आश्वासन दिलं होतं. परदेशातील काळा पैसा भारतात आल्यास प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, असं मोदींनी म्हटलं होतं. याबद्दल संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. 'तुमच्या किंवा अमृता वहिनींच्या खात्यामध्ये १५ लाख जमा झाले का?,' असा प्रश्न राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाला, देशवासियांच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. 'आधी परदेशातील बँकांशी आपल्या देशाचा करार नव्हता. मात्र आता मोदी सरकारनं टॅक्स हेवन असलेल्या १०० पेक्षा अधिक बँकांशी करार केला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही भारतीयानं परदेशांमधील बँकेत काळा पैसा दडवल्यास त्याची माहिती सरकारला मिळेल,' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी संजय राऊत यांनी अनेक मुद्यांवर मुख्यमंत्र्यांना बोलतं केलं. अहमदनगरमधील हिंसाचार, शेतकऱ्यांचा मोर्चा, भीमा-कोरेगावमधील दंगल याबद्दलच्या प्रश्नांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीससंजय राऊतब्लॅक मनी