क्लस्टरवरून शिवसेनेत मतभेद
By Admin | Updated: April 17, 2015 22:45 IST2015-04-17T22:45:02+5:302015-04-17T22:45:02+5:30
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत क्लस्टरचा मुद्दा तापला असताना शिवसेना - भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात त्याचे स्वागत केले आहे.

क्लस्टरवरून शिवसेनेत मतभेद
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत क्लस्टरचा मुद्दा तापला असताना शिवसेना - भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात त्याचे स्वागत केले आहे. तो आमच्या प्रयत्नांमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केल्याचे सांगितले. अडीच चटईक्षेत्रही (२.५ एफएसआय) आमच्यामुळेच मंजूर झाल्याचे युतीने या जाहीरनाम्यात म्हटले आहे. एकीकडे युतीने क्लस्टर आणि अडीच एफएसआयचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या ४१ बंडखोरांनी मात्र दोन्ही मुद्द्यांना विरोध करून ते प्रकल्पग्रस्तांसह शहरवासीयांच्या हिताचे नसल्याचा प्रचार जोशात सुरू केला आहे. यामुळे शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
वाशी येथील एका हॉटेलात युतीने आपला संयुक्त जाहीरनामा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. त्यात भ्रष्टाचारमुक्त शहरविकासाची ग्वाही देताना क्लस्टर आणि अडीच चटईक्षेत्राचे स्वागत केले. मात्र बंडखोरांचे नेते सुरेश म्हात्रे आणि हरिभाऊ म्हात्रे यांनी या दोन्ही मुद्द्यांना विरोध केला आहे. क्लस्टरमुुळे गावठाणे उद्ध्वस्त होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. तर अडीच चटईक्षेत्र केवळ सिडकोने बांधलेल्या धोकादायक इमारतींना लागू असल्याचे सांगून तो सरसकट सर्वच इमारतींना लागू करण्याची मागणी ते प्रचारात करीत आहेत. शिवसेनेचा या जनविरोधी धोरणाला पूर्वीपासून विरोध राहिला आहे. त्यासाठी उपोषणही केले आहे. मात्र, आता पक्षातील उपरे नेते भाजपाच्या मदतीने त्याच मुद्द्यांचे स्वागत करून राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप सुरेश म्हात्रेंनी केला. (खास प्रतिनिधी)
च्युतीतील या मतभेदांचा फायदा काँगे्रस - राष्ट्रवादीने चांगलाच घेतल्याचे दिसत आहे. काँगे्रस नेते रमेश बागवे, राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि गणेश नाईक यांनी क्लस्टर आणि अडीच एफएसआयचा मुद्दा बिल्डरहिताचा असल्याचा आरोप केला आहे.
च्त्यात प्रकल्पग्रस्तांसह सर्वसामान्य घटकांना सामावून घेतलेच पाहिजे, अशी मागणी ते करीत आहेत.