Join us  

चिनी अजगराने खरे स्वरुप दाखवले - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 10:02 AM

जग आमच्या पाठीशी आहे. पण तरीही पाठीत वार होण्याचे थांबत नाही. देशातील सर्वच राजकारण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

मुंबई - संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. व्हिटो पावरचा वापर करुन चीनने मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवले. चीनच्या या कटुनितीचा सामना अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगला समाचार घेतला आहे. 

मसूद अजहरला युनोमध्ये दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांना खोडा घालून चिनी अजगराने त्याचे खरे स्वरूप पुन्हा दाखवले. त्यामुळे पाकिस्तानला बळ मिळेल. मसूद अजहर हा एक मोहरा आहे. तो सहज हाती मिळणार नाही. पाकिस्तानला श्वास घ्यायला वेळ मिळाला आहे व चीन त्यांना प्राणवायू देत आहे. जग आमच्या पाठीशी आहे. पण तरीही पाठीत वार होण्याचे थांबत नाही. देशातील सर्वच राजकारण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.  

उद्धव ठाकरे म्हणाले की, चीन असे का वागला याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. चीन हा पाकिस्तानचा पाठीराखा आहे व राहणार. हिंदुस्थानचा खरा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे. चीनच्या पाठिंब्यावर पाकिस्तानचे शेपूट वळवळत आहे. पाकिस्तानला जगात एकटे पाडल्याचा डंका आपण कितीही वाजवला तरी ते खरे नाही. अमेरिका, युरोपातील अनेक मित्र म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रांनी ‘पुलवामा’ दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार केला व हिंदुस्थानच्या बाबतीत संवेदना व्यक्त केल्या. पण यापैकी एकाही राष्ट्राने कश्मीरबाबत हिंदुस्थानची ठाम बाजू घेतली असे दिसत नाही. दोन राष्ट्रांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवावा व पाकिस्तानने आपली भूमी दहशतवादासाठी वापरायला देऊ नये, असे सांगून वेळ मारून नेणे म्हणजे पाठिंबा नाही. 

दोन राष्ट्रांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवावा व पाकिस्तानने आपली भूमी दहशतवादासाठी वापरायला देऊ नये, असे सांगून वेळ मारून नेणे म्हणजे पाठिंबा नाही. हिंदुस्थानचा वैमानिक अभिनंदन हा पाकच्या ताब्यात होता व त्याला सोडून देण्याबाबत इम्रान खान यांनी शांतिदूताची भूमिका बजावली. मग ती भीती असेल अथवा शरणागती, पण जिनिव्हा करारानुसार युद्धकैद्यास सोडावे लागणारच होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या ‘गूड न्यूज’चे संकेत आदल्या दिवशी दिले होते ती गूड न्यूज अद्याप गुलदस्त्यात आहे. मसूद अजहरला ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्यासाठी अमेरिकेचे कमांडो पथक हाजीर आहे असे ते म्हणाले असते तर ती गूड न्यूज ठरली असती. तसे काही झाले काय? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर आणि हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यानंतर चीनची भूमिका ‘तटस्थ’ होती. त्याचा अर्थ आपल्या कूटनीतीकारांनी असा घेतला की, चीनही आता पाकिस्तानच्या पाठीशी उभा नाही. पण चीनची तटस्थता आणि सोयीचे मौन हे घातक असते हे ‘युनो’तील सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा दिसून आले. चीनने ज्या प्रकारे युनोच्या सुरक्षा परिषदेत मसूद अजहरचा बचाव केला व एक प्रकारे पाकिस्तानला पाठिंबा दिला तो सर्वच प्रकार किळसवाणा, तितकाच निर्घृण आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कोणतेही युद्ध न करता पाकिस्तान आमची अशी हानी करीत आहे व आपण पुलवामा हवाई हल्ल्याचे राजकारण करण्यात धन्यता मानत आहोत. विरोधी पक्षांनी थोडे जबाबदारीने वागावे व सत्ताधारी पक्षाने संयम बाळगावा हाच त्यावरील मध्यम मार्ग आहे असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेचीनसंयुक्त राष्ट्र संघपुलवामा दहशतवादी हल्ला