शिवसेनेने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

By Admin | Updated: April 27, 2015 00:50 IST2015-04-27T00:39:52+5:302015-04-27T00:50:21+5:30

शेती उत्पन्न बाजार समिती : जिल्हाप्रमुखांची परवानगी न घेता युती कोणी केली : पदाधिकाऱ्यांची विचारणा

Shivsena blasts election trumpet | शिवसेनेने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

शिवसेनेने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

कोल्हापूर : सोबत कोण येवो अगर न येवो, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात उतरायचेच, असा निर्धार करून शिवसेनेने निवडणुकीचे रविवारी रणशिंग फुंकले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी युती कोणी केली? जिल्हाप्रमुखांची परवानगी न घेता हे लेबल कोणी लावले? अशी विचारणाही पदाधिकाऱ्यांनी केली.
शासकीय विश्रामगृह येथे बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात मते आजमावून घेण्यासाठी शिवसेनाप्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आ. डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजय पवार म्हणाले, बाजार समितीमधील गैरव्यवहारासंदर्भात अनेकवेळा आंदोलन आंदोलन करूनही निर्ढावलेल्या प्रशासनावर कोणताच परिणाम झालेला नाही. सहकारमंत्री युतीचे असून त्यांना व्यापक शिष्टमंडळाने भेटून विचारणा करूया. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक लुटारू आहेत त्यांची ही प्रवृत्ती गाडण्यासाठी शिवसेनेचे पॅनेल होणे गरजेचे आहे. प्रसंगी भाजपलाही बरोबर घेऊ. जिल्हा बँक निवडणुकीत पक्षाचे उमेदवार आ. मिणचेकर यांच्यासोबतच पक्ष राहील.
विजय देवणे म्हणाले, बाजार समितीच्या गैरकारभाराविरोधात आंदोलने केली. त्यामुळे आपल्यासाठी पोषक वातावरण असून त्यासाठी आजपासून कामाला लागूया.
उपजिल्हाप्रमुख प्रा. शिवाजीराव पाटील म्हणाले, समितीच्या कार्यक्षेत्रातील पक्षाच्या चार आमदारांनी मदत केल्यास आपण निवडणूक नक्कीच जिंकू शकतो.
उपजिल्हाप्रमुख प्रवीणसिंह सावंत म्हणाले, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळून दौरा करू, ताकदीचे उमेदवार दिल्यास कडवे आव्हान उभे राहील. पंचायत समिती सदस्य तानाजी आंग्रे, प्रकाश पाटील यांचीही भाषणे झाली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जि. प. सदस्य बाजीराव पाटील, कृष्णात पोवार, राजू यादव, संभाजी भोकरे, आप्पा पुणेकर, प्रवीण पालव, विराज पाटील, आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)


मंडलिकांबाबत पक्षप्रमुखच निर्णय घेतील
पक्षाचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी केलेल्या युतीबाबत पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार ? अशी विचारणा केल्यावर ते माझे वरिष्ठ आहेत. पक्षप्रमुखच त्यावर निर्णय घेतील, असे उत्तर पवार यांनी दिले.



डोकी फोडायला लावणारे एकत्र ?
अनेक वर्षे टोकाचा संघर्ष करून कार्यकर्त्यांना डोकी फोडायला भाग पाडणाऱ्यांनी आता चिडीचूप होऊन त्यांचे पॅनेल केले आहे, अशी कोपरखळी हाणत शिवसेनेपुढे सैनिक महत्त्वाचा असून अन्य कोणी नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.


बुधवारी मोर्चा
बाजार समितीमधील गैरव्यवहारासंदर्भात जाब विचारण्यासाठी बुधवारी मोर्चा काढून समितीच्या दारात शंखध्वनी केला जाईल, असे पवार यांनी सांगितले.


‘आप्पां’चा हंटर
‘आप्पा’ महाडिकांकडे असा कोणता हंटर आहे की त्यांच्या विरोधात असणारेही पुन्हा त्यांच्या मांडवात जाऊन बसतात, अशी टीका संजय पवार यांनी सोयीचे राजकारण करणाऱ्यांवर केली.

Web Title: Shivsena blasts election trumpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.