शिवनेरी अडकल्या निविदेत

By Admin | Updated: February 3, 2015 02:08 IST2015-02-03T02:08:39+5:302015-02-03T02:08:39+5:30

एसटीच्या मुदत संपलेल्या आणि नादुरूस्त असलेल्या एसी शिवनेरी बसेस अजूनही प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहेत.

Shivneri stuck idle | शिवनेरी अडकल्या निविदेत

शिवनेरी अडकल्या निविदेत

मुंबई : एसटीच्या मुदत संपलेल्या आणि नादुरूस्त असलेल्या एसी शिवनेरी बसेस अजूनही प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहेत. नवीन एसी शिवनेरी बसेस ताफ्यात आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न जरी सुरू असले तरी हे प्रयत्न फोल ठरत आहेत. महामंडळाकडूनच निविदा प्रक्रियेत सातत्याने बदल केले जात असून, त्यामुळे नवीन शिवनेरी येण्यास विलंब होत आहे. गेल्या सहा महिन्यांत असे अनेक वेळा बदल करण्यात आल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
एसटीच्यात ताफ्यात सध्याच्या घडीला ११0 एसी शिवनेरी बसेस असून, यामध्ये फक्त २४ बसेस एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. भाडेतत्त्वावर असलेल्या ८६पैकी २५ बसची तीन वर्षांची मुदत कधीच संपली होती. मात्र ही मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावत होत्या. तरीही या बसच्या कंत्राटदारांना एक वर्षाची मुदत वाढवून दिली आणि आता ही मुदत मार्चपर्यंत संपुष्टात येत आहे. एसटी महामंडळाने स्वत:च्या मालकीच्या २५ नवीन बस आणि ३५ भाड्याच्या एसी शिवनेरी बस ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून हा निर्णय प्रत्यक्षात उतरत नसल्याचे दिसून आले. या एसी बस निविदा प्रक्रियेतच अडकल्याचे सूत्रांनी सांगितले. २0१४च्या आॅगस्ट महिन्यात स्वत:च्या मालकीच्या बस घेण्यासाठी निविदा काढली, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ती सप्टेंबरपर्यंत वाढविली. त्याचवेळी सप्टेंबर महिन्यात भाड्याने एसी बस घेण्यासंदर्भातीलही निविदा काढण्यात आली. परंतु या निविदांनाही प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा त्याची निविदा काढली. अजूनही यातील भाड्याने बस घेण्यासंदर्भातील निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. (प्रतिनिधी)

मुळात एसटीकडून काढण्यात आलेल्या निविदांच्या अटींमध्ये अनेक बदल अधिकाऱ्यांकडून केले जातात. त्यामुळेच हे बदल कंत्राटदारांना ‘रुचत’ नसून प्रक्रियेस विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवनेरी बस घेण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया काढण्यात आली. यातील काही स्वत:च्या मालकीच्या आणि काही भाड्याच्या एसी बस असतील. यामधील आमच्या मालकीच्या बससाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला आहे. मात्र भाड्याच्या बससाठी काढण्यात आलेल्या निविदांना अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही.
- संजय खंदारे, एसटी महामंडळ, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

Web Title: Shivneri stuck idle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.