शिवकालीन तोफांनी वाढवली नगर परिषदेची शान
By Admin | Updated: December 1, 2014 22:42 IST2014-12-01T22:42:12+5:302014-12-01T22:42:12+5:30
बंदर परिसरात सापडलेल्या शिवकालीन तोफा पनवेल नगरपालिकेत अगदी अडगळीत टाकण्यात आल्या होत्या. या तोफा दर्शनी भागात लावण्याकरिता पालिका प्रशासनाला पुरातत्व विभागाने आदेशही दिले होते.

शिवकालीन तोफांनी वाढवली नगर परिषदेची शान
पनवेल : बंदर परिसरात सापडलेल्या शिवकालीन तोफा पनवेल नगरपालिकेत अगदी अडगळीत टाकण्यात आल्या होत्या. या तोफा दर्शनी भागात लावण्याकरिता पालिका प्रशासनाला पुरातत्व विभागाने आदेशही दिले होते. मात्र याबाबत गेल्या तीन वर्षांपासून टोलवाटोलवी करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्याकरिता पालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर चौथरे बांधून त्यावर तोफा बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
पनवेल बंदर शिवकाळात अस्तित्वात असल्याचे काही पुरावे आहेत. बंदर परिसरातील जागा काही वर्षापूर्वी मेरिटाईम बोर्डाला देण्यात आली होती. त्या ठिकाणी अकादमी उभारण्यात आली आहे. संबंधित संस्थेच्या आवारात आठ शिवकालीन तोफा जानेवारी २०११ साली आढळल्या होत्या. तत्कालीन तहसीलदार डॉ. संदीप माने यांनी याबाबत पुरातत्व विभागाला कळविले होते. त्यानुसार तोफा हलविण्याच्या सूचना पनवेल नगरपालिकेला देण्यात आल्या. त्यानुसार गणेश कडू यांच्या शिवतेज संस्थेचे अध्यक्ष प्रणय बहिरा, प्राजक्ता बद्रिके, मानसी चांचड यांनी पुढाकार घेवून उत्खनन केले. स्वखर्चाने या तोफा हलविण्यात पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार हा शिवकालीन ठेवा पालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. एक तोफ पालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावरही लावण्यात आली.
२४ जानेवारी रोजी पालिकेच्या हद्दीत बसविण्याचा ठरावही संमत करण्यात आला. भविष्यात शहरात वस्तुसंग्रहालय झाल्यानंतर या तोफा त्या ठिकाणी हलविण्याच्या प्रस्तावाचा उल्लेख ठरावात होता. मात्र गेल्या तीन वर्षात संबंधित तोफांना सन्मान देण्यात आला नव्हता. त्यांना अडगळीत जागा दिल्याने त्या कोणीही पायदळी तुडवत होत्या. शिवतेज संस्थेने या तोफा शिवाजी उद्यान, हुतात्मा स्मारक आणि पालिका भवनात लावण्याचा प्रस्ताव दिला होता. (वार्ताहर)