रोहित नाईकउपमुख्य उपसंपादक
मुंबई क्रीडा विश्व आणि शिवाजी पार्क हे एक पक्के समीकरण आहे. मुंबईची क्रीडा संस्कृती शिवाजी पार्कच्या उल्लेखाविना पूर्ण होऊच शकणार नाही. विविध खेळांची ‘नर्सरी’ असलेल्या या ऐतिहासिक मैदानामध्ये एका बाजूला वसले आहे ते मुंबई क्रीडा क्षेत्रातील एक प्रतिष्ठित क्लब तो म्हणजे, ‘शिवाजी पार्क जिमखाना’ म्हणजेच एसपीजी.
या जिमखान्याचे काही दिवसांपूर्वीच नवे रूप सर्वांसमोर आले. गेली दोन वर्षे नूतनीकरणामुळे बंद असलेले शिवाजी पार्क जिमखाना आज नव्या स्वरूपात दिमाखात क्रीडाप्रेमींसमोर आले आहे. १९०९ साली ‘दी न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब’ या नावाने या जिमखान्याची स्थापना झाली. सुरुवातीला हा जिमखाना दादर रेल्वेस्थानकाच्या उत्तरेकडील एका पायाभूत मैदानावर होता; पण नंतर जी. आय. पी. रेल्वेने (ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे) ही जमीन घेतल्यानंतर हा जिमखाना इम्प्रोव्हमेंट ट्रस्टकडून दादर स्थानक पूर्वेकडील जागेत गेले. १९२३ मध्ये इम्प्रोव्हमेंट ट्रस्टने दादर येथील व्हिन्सेंट रोड येथे एक प्लॉट या जिमखान्यासाठी दिला. त्यावेळी या जिमखान्याचे नाव ‘दी दादर हिंदू जिमखाना’ असे बदलले गेले. १९२५ साली त्यावेळच्या बाँबे म्युन्सिपल काॅर्पोरेशनने साकारलेले भलेमोठे मैदान ‘माहिम पार्क’ म्हणून ओळखले जाऊ लागले. याच मैदानाचे १९२७ साली ‘शिवाजी पार्क’ असे नामकरण झाले आणि त्यामुळे येथे आलेल्या या जिमखान्याचे नाव ‘शिवाजी पार्क जिमखाना’ असे ठेवण्यात आले. १९३१ साली या जिमखान्याच्या पॅव्हेलियनची उभारणी झाली होती.
सांस्कृतिकदृष्ट्याही संपन्न
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्व जिमखान्यांमध्ये केवळ ब्रिटिशांची मक्तेदारी होती. या काळापासून ‘एसपीजी’ने मराठमोळी संस्कृती अभिमानाने जपली आहे. ‘एसपीजी’ने स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ ते विविध राजकीय पक्षांचा प्रवास पाहिला आहे. विजय मांजरेकर, अजित वाडेकर यांच्यापासून आताच्या शार्दूल ठाकूरपर्यंतची अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची पिढी घडवली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या कारकीर्दीतही ‘एसपीजी’चे योगदान राहिले आहे. अनेक थोर साहित्यिक व कलाकारांच्या सहवासानेही ‘एसपीजी’ सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न राहिला आहे.
Web Summary : Shivaji Park Gymkhana, established in 1909, is a Mumbai sports institution. From cricket legends to cultural icons, it fostered generations. Recently renovated, it continues to promote sports and Marathi culture.
Web Summary : 1909 में स्थापित, शिवाजी पार्क जिमखाना मुंबई का एक खेल संस्थान है। क्रिकेट के दिग्गजों से लेकर सांस्कृतिक प्रतीकों तक, इसने पीढ़ियों को बढ़ावा दिया। हाल ही में नवीनीकृत, यह खेल और मराठी संस्कृति को बढ़ावा देना जारी रखता है।