शिवप्रेमींमध्ये जल्लोष, मुंबई शहर उपनगरात भगवे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 02:14 AM2020-02-20T02:14:20+5:302020-02-20T02:14:35+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९०व्या जयंतीनिमित्त मुंबई शहर व उपनगरात

Shiva lovers flock, city saffron atmosphere in mumbai | शिवप्रेमींमध्ये जल्लोष, मुंबई शहर उपनगरात भगवे वातावरण

शिवप्रेमींमध्ये जल्लोष, मुंबई शहर उपनगरात भगवे वातावरण

Next

मुंबई : ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात मुंबईतील शहर, उपनगरात बुधवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ गर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. ठिकठिकाणच्या मिरवणुकींची सांगता दुपारी झाली. तसेच दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९०व्या जयंतीनिमित्त मुंबई शहर व उपनगरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईकर भगव्या रंगात नाहून गेले होते. देशभरातील शिवप्रेमींनी हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला. यंदाही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिभावाने लहानग्यांपासून ते थोरामोठ्यापर्यंतच्या सर्व शिवप्रेमींनी शिवजयंती साजरी केली. सगळीकडे ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा घोष आसमंतात घुमला होता, याशिवाय काही ठिकाणी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली, तर शिवकालीन नाणी, गड-किल्ले प्रतिकृती स्पर्धा व प्रदर्शन आणि गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.

गेट वे आॅफ इंडिया येथे कार्यक्रम...
भारताचे प्रवेशद्वार (गेट वे आॅफ इंडिया) येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित समारंभास महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, समितीचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक किसन जाधव, संयुक्त चिटणीस संजय शेटये, खजिनदार प्रकाश बांबर्डेकर यांच्यासह महापालिकेच्या ए विभागाचे सहायक आयुक्त चंदा जाधव उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौरांनी पुष्पहार अर्पण केले. सकाळी ७ ते ९ या वेळेत चौघडा व सनई वादन करण्यात आले.

मुंबई काँग्रेस कार्यालयातही अभिवादन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेस कार्यालयात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह माजी आमदार मधू चव्हाण आणि चंद्रकांत हंडोरे, भंवरसिंह राजपुरोहित, राजेश ठक्कर, नितीन पाटील, संदीप शुक्ला, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ढोल-ताशांच्या गजरात चारकोपमध्ये मिरवणूक
शिवसंस्कृती प्रतिष्ठान (चारकोप)तर्फे ‘शिवजयंती उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. कांदिवली पश्चिमेकडील चारकोप सेक्टर ६, म्हाडा स्टोर्ससमोर, आकर्षक ६०३ सोसायटींच्या समोरील आवारातील सुपंथ ६०२ येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती संपन्न झाली. यावेळी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. त्यानंतर, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय सायंकाळी ५ वाजता पायी पालखी आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

प्रभादेवीत गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा
स्वराज्य शिलेदार यांच्या वतीने ‘श्रीशिवजयंती उत्सवानिमित्त’ प्रभादेवीमध्ये प्रथमच ‘गड-किल्ले प्रतिकृती स्पर्धा व प्रदर्शन’, ‘शिवकालीन नाणी’, ‘गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शन’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी उद्यानात २० फेबु्रवारीपर्यंत सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

शिवजयंती मुंबईत जल्लोषात साजरी

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९०व्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेतर्फे बुधवारी ‘शिवजयंती उत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या मुख्य समारंभात अग्निशमन दलाच्या स्नॉर्कल (शिडी)च्या साहाय्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहिली. यानंतर, शिवाजी पार्कमधील क्रीडा भवन येथे छोटेखानी सांस्कृतिक समारंभ झाला. यामध्ये राज्यपाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते, तर महापौर या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गौरवपर मराठी गीते सादर केली. या चमूने उत्कृष्ट गीते सादर केल्याबद्दल राज्यपालांनी पंचवीस हजार रुपयांची भेट जाहीर केली. चहापानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
 

Web Title: Shiva lovers flock, city saffron atmosphere in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.