कावळा तारेला शिवला; विद्युत पुरवठा खंडित
By Admin | Updated: August 12, 2014 00:24 IST2014-08-11T23:28:28+5:302014-08-12T00:24:47+5:30
कावळा पिंडाला शिवल्याशिवाय मृतात्म्यास शांती मिळत नाही, अशी समाजात पूर्वापार समजूत आहे़ मात्र, हाच कावळा वीजवाहक तारेस शिवला

कावळा तारेला शिवला; विद्युत पुरवठा खंडित
डोंबिवली : कावळा पिंडाला शिवल्याशिवाय मृतात्म्यास शांती मिळत नाही, अशी समाजात पूर्वापार समजूत आहे़ मात्र, हाच कावळा वीजवाहक तारेस शिवला तऱ़़ तुमच्या घरातच नव्हे संपूर्ण परिसरात अंधार पसरलाच समजा़
डोंबिवली शहरात विशेषत: पूर्व - पश्चिम भागात पंधरवड्यापासून दिवसा-रात्री कधीही कोणत्याही वेळेला विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्राहक हैराण आहेत. या घटना का घडत आहेत याची माहिती घेतली असता महावितरणचे कनिष्ठ अभियंता भट्टाचार्य यांनी वीजवाहक तारांसह खांबांवरील पुंजक्याच्या ठिकाणी कावळा शिवल्याने (संपर्कात) आल्याने कंडक्टर फेल होऊन हा वीजपुरवठा खंडित होत असल्याचा तर्कट खुलासा केला आहे़ यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आहे.
गेल्या रविवारी फडके क्रॉस रोडवरील एक विद्युत वाहक तारांचा खांब वाकल्याने सुटीच्या दिवशी डोंबिवलीकरांचा पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. तेव्हापासून रोज कधी अर्धा ते दोन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण आहेत. एकीकडे अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करण्याचा चंग बांधताना केवळ कावळा शिवण्यासारख्या घटनांनी तांत्रिक समस्या उद्भवून विद्युत पुरवठा खंडित होणे हे कारण न पटण्यासारखे असल्याचे नागरिक सांगतात.
वर्षभरापासून महावितरणच्या माध्यमातून ठिकठिकाणी केबल्स (वायर) भूमिगत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ते काम अद्यापही संपले नाही का? आणि ती कामे पूर्ण करण्याचा निश्चित कालावधी काय आहे, असेही सवाल उपस्थित होत आहेत.
ज्या तारा जीर्ण झाल्या आहेत त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना त्रास का दिला जात आहे याबाबतच्या अनेक तक्रारींनी येथील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांचे नेतेही त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)