Join us  

Raj Thackeray Live Speech : राज ठाकरे काय बोलणार? थोड्याच वेळाच मनसेचा पाडवा मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 6:00 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले

मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर मनसेच्यावतीने ‘पाडवा मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  गुढी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी राजकीय गुढी उभारणार आहे. मनसे पाडवा मेळावा निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रसैनिकांना नेमका काय संदेश देतात त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य आहे.  

मनसेच्या स्थापनेला शुक्रवारी (9 मार्च) 12 वर्षं पूर्ण झाली. यावेळी सोहळ्यादरम्यान बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की,  18 तारखेला, गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेत मी माझं म्हणणं मांडेन, असं राज यांनी स्पष्ट केलं होतं. 18 मार्चला मी बोलणार असल्याने बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरू होतात. पण, यावेळी दिवे घालवणाऱ्या अधिकाऱ्यांशी आधी बोलून ठेवा. सभा सुरू असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. कारण, इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील तर त्यांना हिसका दाखवणं गरजेचं आहे, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते.  

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरु असून, मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी समाज माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात पोस्टरही लावण्यात आली आहेत.

काय बोलणार राज ठाकरे? गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभेचं आयोजन केले आहे. या सभेतून राज ठाकरे राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवाय, पक्षाची भविष्यातील वाटचालही मांडणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये राज ठाकरे पवारांसोबत झालेल्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे सांगणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, गेली 12 वर्षं मराठी माणूस, भूमिपुत्र, मराठी भाषा हे प्रमुख मुद्दे घेऊन लढणाऱ्या आणि 'खळ्ळ-खटॅक'साठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढचा अजेंडा काय असेल, त्यांचं 'इंजिन' कुठल्या दिशेनं पुढे जाईल, हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार आहेत.  

कोणती घोषणा करणार ?गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांनी फेसबुकवर व्यंगचित्रे प्रसिध्द करून अनेकांचा खरपूस समाचार घेतला आहे. तर; पुण्यात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली जाहीर मुलाखत त्यानंतर काल राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट, या पार्श्वभूमीवर आज होणा-या पाडवा मेळाव्यात देशासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत ते कोणती भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकहून निघालेला किसान मोर्चा आझाद मैदानात धडकला होता. या मार्चाला राज ठाकरे यांनी जाहीर पाठींबा देत, सायन येथील सौमय्या मैदनात त्यांनी मोर्चेकरांची भेट घेतली होती.हे सरकार तुमचे प्रश्न सोडवणार नाही, माझ्या हातात सत्ता देऊन पहा तुमचे प्रश्न सुटतात की नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते. त्यामुळे राज ठाकरे हे आजच्या आपल्या भाषणात राज्य सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेण्याची शक्यता असून, चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय यावरून ते शिवसेनेवर ही हल्ला चढविण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरे हे आज कोणती नवी घोषणा करणार याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांसह, राजकिय पक्षांचेही याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :मनसे गुढीपाडवा मेळावामनसेराज ठाकरे