Join us  

शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका; वाद चिघळण्याची शक्यता

By मुकेश चव्हाण | Published: January 29, 2021 1:44 PM

शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे. 

मुंबई: मुंबईत वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत मनसेप्रमुखराज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित आहे. काही दिवसांपूर्वी देखील राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली होती. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.    

शॅडो' चे पण 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी', असं ट्विट करत वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबावर आतापर्यंत वैयक्तिक टीका टाळणाऱ्या शिवसेननं पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबाबाबत जाहीर टीका केल्याने मनसे यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

27 फ्रेब्रुवारीला मराठी भाषा दिनी , उत्सव म्हणून साजरा केला जाईल. मराठी स्वाक्षरी मोहीम घेतली जाणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिली. तसेच राज ठाकरे हे स्वतः अनेक ठिकाणी स्वाक्षरी करण्यास जाणार आहेत. मराठी शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. 9 मार्च हा पक्षाचा वर्धापनदिन आहे. यावेळी निवडणुका जवळ आलेल्या आहेत. 9 फ्रेबुवारी ते 12 एप्रिलपर्यंत सदस्य नोंदणी केली जाईल, अशी माहिती बाळा नांदगांवकर यांनी यावेळी दिली. 

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राज ठाकरेअयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान राज यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतं.  मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता. 

मनसेची उत्तर भारतीयांविरोधाची भूमिका मवाळ झाली तर पुढचा विचार होऊ शकेल, असंही भाजपकडून विधान करण्यात आलं होतं. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानं ही मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच वरुण देसाई यांनी मनसेवर टीका करणाऱ्या ट्विटची मालिका सुरू केली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा उल्लेख वीरप्पन गँग असा केला, त्यावर वरुण सरदेसाई यांनी पलटवार करत मनसे खंडणीखोर असल्याची टीका केली. वरुण सरदेसाई यांच्या या टीकेला पुन्हा संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं. मी वीरप्पनबद्दल बोललो, तर वरुण देसाईला का झोंबलं, माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

 

टॅग्स :राज ठाकरेअमित ठाकरेशिवसेनामनसेउद्धव ठाकरे