Join us

सरकारच्या ‘लोकराज्य’मध्ये शिवसेनेला दुय्यम स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 07:29 IST

लोकराज्य अंकातील पहिल्या पानावर ‘होय, प्रगती करतोय महाराष्टÑ माझा’ अशी जाहीरात प्रकाशित करण्यात आली.

मुंबई : लोकराज्य या शासनाच्या मुखपत्रातून दुय्यम स्थान मिळत असल्याची शिवसेनेची खदखद होती. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या लोकराज्यमधील जाहिरातीवरुन ही खदखद बाहेर पडली आणि छापलेले अंक बाजूला ठेऊन पुन्हा नव्याने जाहिरात छापलेला अंक बाजारात आणण्यात आला.

लोकराज्य अंकातील पहिल्या पानावर ‘होय, प्रगती करतोय महाराष्टÑ माझा’ अशी जाहीरात प्रकाशित करण्यात आली. त्यात कॅबिनेट मंत्र्यांचे फोटो छापण्यात आले. मात्र ते छापत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई यांची छायाचित्रे तब्बल दहाव्या व अकराव्या क्रमांकावर छापण्यात आली. तो अंक हाती पडल्यावर रावते संतप्त झाले. मंत्रीमंडळात आमचे स्थान कोणते, आम्ही कितव्या नंबरवर आहोत, आमच्यापेक्षा ज्युनियर नेत्यांचे फोटो आधी छापता आणि नंतर आमचा नंबर कसा काय लावता, अशी विचारणा करत रावते यांनी माहिती खाते डोक्यावर घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटी छापलेले अंक बाजूला ठेवले गेले व चार नंबरवर रावते यांचा फोटो लावून पुन्हा छापलेले लोकराज्य बाजारात आणले गेले. मात्र या गडबडीत इंग्रजी अंकात ही चूक तशीच राहून गेल्याने पितळ उघडे पडले.नवीन अंक केला वितरितअंकाच्या काही प्रति छापून त्या मंत्रीमंडळ बैठकीत दाखवल्या होत्या. मात्र, ते पाहून रावते यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांचा क्रम कसा असावा, याविषयीचा शासन आदेश होताच. तो पाहिला गेला नव्हता म्हणून ही चूक झाली. ती लगेच दुरुस्त करुन नवीन अंक वितरित केले गेले, असे या अंकाचे संपादक मंडळ प्रमुख अजय अंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :शिवसेनामुंबई