Join us

कोळीवाड्यांमध्ये एसआरए योजना राबवण्यास शिवसेनेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 15:22 IST

कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सामूहिक पुनर्विकास योजना राबवावी

मनोहर कुंभेजकर

मुंबई - मुंबईत 31 कोळीवाडे व 189 गावठाणे असून त्यांचा समावेश पालिकेच्या 2014 ते 2034 च्या नवीन विकास आराखड्यात करण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात कोळीवाड्यांमध्ये जर पुनर्विकासाच्या नावाखाली एसआरए योजना राबवण्याची भीती आहे. जर ही योजना राबविल्यास त्याला शिवसेनेचा ठाम विरोध राहील. सीआरझेड अंतर्गत असलेल्या कोळीवाड्यांमधील घरे नियमित करून त्यांना घर दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात यावी, कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सामूहिक पुनर्विकास योजना (स्वतंत्र क्लस्टर योजना ) राबवावी अशी स्पष्ट भूमिका शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार व मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज लोकमतशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केली.

कोळी आणि आगरी बांधव हे मुंबईचे मूळ नागरिक असून शेकडो वर्षांपासून त्यांचे मुंबई शहरात वास्तव्य आहे. आजही कोळी व आगरी बांधवांनी आपली संस्कृती व परंपरा टिकवून ठेवली आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले. कोळीवाड्यांमध्ये  एसआरए योजना राबवण्यास शिवसेनेचा विरोध का? असे विचारले असता आमदार प्रभू म्हणाले की,जर कोळीवाड्यांमध्ये एसआरए योजना राबविल्यास भविष्यात येथे मोठे गगनचुंबी टॉवर्स उभे राहतील आणि कोळीवाड्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. बिल्डर येथील टॉवर्स करोडो रुपयांमध्ये शेटजींना विकतील, आणि मग मासे खाणाऱ्यांना येथे प्रवेश नाही असे मोठे फलक या टॉवर्समध्ये लागतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

2011 पासून कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी सीमांकन प्रलंबित आहे ते लवकर पूर्ण करण्यात यावे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहा महिन्यात सीमांकन होणार असल्याची नुकतीच घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले. कोळीवाडे व गावठाणे ही मुंबईची शान आहे.त्यामुळे त्यांची संस्कृती व परंपरा या टिकल्या पाहिजेत अशी शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे असे त्यांनी सांगितले. विधानसभेत 293 अंतर्गत झालेल्या चर्चेत आपण या सर्व गोष्टीं प्रभावीपणे मांडून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली असल्याचे आमदार प्रभू यांनी शेवटी सांगितले. 

टॅग्स :मुंबई