Join us  

पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेना आक्रमक; मुंबईत आज भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 7:23 AM

शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. सततच्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी ‘लाचार’ झाला आहे. तो आत्महत्येच्या कडय़ावर उभा आहे. तरीही त्याची श्रद्धा काळय़ा आईवर आहे. 

मुंबई - शेतकऱ्यांना नडाल तर शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल असा इशारा देण्यासाठी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचा आज मुंबईत प्रचंड मोर्चा निघणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) ‘भारती एक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी होणार आहेत. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत आजच शिवसेनेचा मोर्चा निघत आहे. या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा ‘शहरीबाबूं’नी मोठय़ा संख्येने सामील व्हावे व शेतकऱ्यांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. सामना संपादकीयमधून शिवसेनेने पीक विमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे 

  • वादळवारा, पूर, दुष्काळाचा सामना करीत आणि सुल्तानी कारभाराशी संघर्ष करीत शेतकरी मातीत राबतो, म्हणून शहरात आपण दोन घास खातो. शेतकरी हाच तुमचा-आमचा खरा अन्नदाता आहे. शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. सततच्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी ‘लाचार’ झाला आहे. तो आत्महत्येच्या कडय़ावर उभा आहे. तरीही त्याची श्रद्धा काळय़ा आईवर आहे. 
  • सरकारने ‘योजनां’च्या घोषणा करूनही त्याचा लाभ झारीतले शुक्राचार्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. पीक विमा योजना हे त्या हेराफेरीचे उत्तम उदाहरण. मल्ल्या, मोदी, चोक्सी हजारो कोटींचा घोटाळा करून पळून जातात. पण शेतकऱ्यास त्याच्या हक्काचे ‘देणे-घेणे’ पीक विमा कंपन्या मिळू देत नाहीत. 
  • अशा मुजोर विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. त्यांची मुजोरी मोडून त्यांना शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकवण्यासाठी शिवसेनेचा आजचा मोर्चा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि स्वाभिमानाला मानवंदना देण्यासाठी हा मोर्चा आहे. 
  • हिंदुस्थानी सैन्यात लढणारी, शहीद होणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. बहुसंख्य जवानांचे माता-पिता हे शेतावर राबणारे आहेत. जवान निवृत्त होऊन खेडय़ात जातो तेव्हा तो काळय़ा आईच्या कुशीत विसावतो. आधी तो भारतमातेची सेवा करतो व शेवटी काळय़ा आईची सेवा करतो. पण शेतकरी आणि जवानांच्या राष्ट्रसेवेची आपण काय कदर करतो? 
  • सीमेवरील जवानांचे हौतात्म्य व शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशासाठी चिंतेचा विषय ठरत नसून राजकारणाचा विषय ठरतो याचे आम्हाला दुःख वाटते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख, दैन्य अस्वस्थ करणारे आहे. 
  • कापूस, हरभरा, ज्वारी, बाजरी, दूध, भाज्या, फळबागा, ऊस, द्राक्ष, डाळिंबाची उभी पिके कधी करपून जात आहेत तर कधी गारपिटीत आडवी होत आहेत. पण शेतकऱ्यांचा आक्रोश कधी मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचला आहे काय?  
टॅग्स :शिवसेनाशेतकरीमुंबई