पाणीगळती विरोधात शिवसेनेचा मोर्चा
By Admin | Updated: December 20, 2014 22:54 IST2014-12-20T22:54:43+5:302014-12-20T22:54:43+5:30
अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा केला जात असतांनाही शहरात नागरिकांना अपुरो पाणी मिळत आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे उघड झाले आहे.

पाणीगळती विरोधात शिवसेनेचा मोर्चा
अंबरनाथ : अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा केला जात असतांनाही शहरात नागरिकांना अपुरो पाणी मिळत आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चातही अधिकाऱ्यांनी ही बाब कबुल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ शनिवारी आली
गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खुंटवली, गणेशनगर, बालाजीनगर, मेठल नगर, बुवापाडा, भास्करनगर, जावसईगांव, फुलेनगर, कमलाकर नगर आणि दिपक नगर आदी भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राधिकरणामार्फत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यासमस्येसंदर्भात अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊन देखील कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वितरण व्यवस्थेतील आपल्या चुकादेखील कबुल केल्या. वाळेकर यांनी शहराला किती पाणी पुरवठ्याची गरज आणि आणि किती पाणीपुरवठा होतो, याची विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी शहराला ५० दशलक्ष लिटर्स ऐवढा पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत ३५ दशलक्ष लिटर्स ऐवढेच पाणी वितरीत केले जाते. ५० पैकी ३५ दशलक्ष लिटर्स पाणी नागरिकांपर्यंत पोहचत असेल तर १५ दशलक्ष लिटर्स येवढ्या पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेली गळती रोखण्याची मागणी शिवसेनेने केली. पाण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये संतप्त नागरिकांनी प्राधिकरणाविरोधात घोषणा दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेने यावेळी घेतली. या मोर्चात सुनिल चौधरी, राजेश वाळेकर, मनिषा वाळेकर, विजय पवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)