Join us  

अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारी, राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 12:23 PM

अयोध्येत राम मंदिर लवकर बांधावे ही शिवसेनेची जुनी मागणी धसास लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख येत्या 24 नोव्हेंबरला दुपारी खास विमानाने अयोध्येला जाणार आहेत.

मनोहर कुंभेजकरमुंबई - अयोध्येत राम मंदिर लवकर बांधावे ही शिवसेनेची जुनी मागणी धसास लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख येत्या 24 नोव्हेंबरला दुपारी खास विमानाने अयोध्येला जाणार आहेत. चलो अयोध्येचा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केला होता. त्यानुसार 25 नोव्हेंबरला चलो अयोध्या असा नारा देत शिवसेनेने राज्यात जोरदार शक्ति प्रदर्शन करत जय्यत तयारी सुरू केली आहे. सोशल मीडिया तसेच होर्डिंग्ज यांच्या माध्यमातून तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख,जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख आपल्या भागात शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांचा बैठका घेत त्यांना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा तपशील आणि त्यांच्या भागात त्यांनी कशाप्रकारे महाआरती आयोजित करावी याचा सविस्तर तपशिल त्यांना सांगत असल्याचे चित्र आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे निवडक 100 नेते अयोध्येला 24 तारखेला जाणार असून राज्यातून सुमारे 25000 शिवसेनेचे निवडक पदाधिकारी अयोध्येला जाणार आहेत. तर मुंबईसह राज्यातील शिवसेनेच्या आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर राज्यातील महाआरतीची जबाबदारी टाकण्यात आल्याचे समजते.याव्यतिरिक्त राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला आपली वाहने,रेल्वे, विमानाने जाणार आहेत.रेल्वे आणि विमानाची सर्व तिकीटे आधीच संपली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दोऱ्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांच्यावर आहे,तर लखनऊ पासून ते अयोध्ये पर्यंतची जबाबदारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री(उपक्रम)एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत जाणार आहेत.तर 24 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता अयोध्येत शरयू तीरावर उद्धव ठाकरे महाआरती करणार असून याचवेळी राज्यातील  350 तालुक्यात सायंकाळी राज्यातील प्रमुख राम मंदिर व इतर मंदिरा समोर महाआरती होणार आहे.शिवसेनेची मुंबईतील महिला आघाडी अयोध्येत जाणार नसून सिद्धिविनायक मंदिरात महिला आघाडी महाआरती करणार आहे.यावेळी शिवसेना जोरदार शक्ति प्रदर्शन करणार आहे.

आज दुपारी राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक होणार असून उद्धव ठाकरे 24 व 25 नोव्हेंबरच्या नियोजित अयोध्या दौऱ्याचा तपशील जाहिर करणार असल्याचे समजते.

अयोध्येचा संपूर्ण भाग हा सर्वोच्य न्यायालयाच्या देखरेखीखाली असल्याने उद्धव ठाकरे हे 25 नोव्हेंबरला अयोध्येच्या जागेचे दर्शन घेणार असून त्यानंतर ते साधू संतांच्या आखाड्यात जाऊन त्यांच्या गाठी भेटी घेणार आहे.उद्धव ठाकरे यांची अयोध्येत मोठी जाहिर सभा होणार असून त्यांची ही राज्याबाहेरील पहिलीच जाहिर सभा असल्याने ते काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराम मंदिरअयोध्या