Join us  

नाना जगन्नाथ शंकरशेट शाळा वाचवणारच- नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 7:57 PM

मराठी शाळा वाचवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं गोऱ्हेंनी म्हटलं

मुंबई: गिरगावमधील मोडकळीस आलेल्या नाना जगन्नाथ शंकरशेट मुलींच्या मराठी शाळेची आज शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली. ही शाळा तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्यास तिचं जतन केलं जाईलच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. नाना जगन्नाथ शंकरशेट मुलींची मराठी शाळा मोडकळीस आल्याची माहिती शंकरशेट प्रतिष्ठानकडून गोऱ्हे यांना देण्यात आली होती. यानंतर गोऱ्हे आज शाळेची पाहणी केली. गरज पडल्यास माझा विधानपरिषदेचा निधी वापरुन शाळा दुरुस्त करेन, असं यावेळी त्यांनी म्हटलं. 'राज्यातील मराठी शाळा टिकल्याच पाहिजेत यासाठी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा कायम प्रयत्न असतो. सामाजिक कामात शिवसेना कायम सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत असते. नाना जगन्नाथ शंकरशेट यांचं सामाजिक कार्यात मोठे योगदान होतं. तसंच ही शाळा 170 वर्षे जुनी असल्यानं अनेक पिढ्यांच्या आठवणी या शाळेशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या शाळेच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी नक्की प्रयत्न करू. अन्यथा पुरातत्व विभागाकडे वास्तु सुपूर्द करून मुलींची शाळा वाचवू,' असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. यावेळी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, गिरगावचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ, शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट (मुरकुटे) आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :शिवसेनाशाळा