Join us  

कराची बेकरी नावाच्या वादातून सेनेने अंग झटकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 6:51 AM

कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर स्पष्ट केले.

लोकमत  न्यूज नेटवर्कमुंबई :  कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल अशी नावे मुंबईत चालणार नाहीत. पंधरा दिवसांत कराची नाव असलेल्या पाट्या बदला, असा इशारा शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी दुकानदारांना दिला. त्यावरून राजकीय घमासान सुरू झालेले असतानाच कराची नाव बदला, ही शिवसेनेची भूमिका नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

वांद्रे येथील कराची बेकरीचे नाव बदलण्याची मागणी नांदगावकर यांनी गुरुवारी केली. कराची हे नाव पाकिस्तानमधील आहे आणि या नावामुळे आपल्या सैनिकांचा अपमान होत असल्याचा दावा त्यांनी केला. देशातील प्रमुख शहरांसह मुंबईत अनेक ठिकाणी कराची बेकरी आणि स्वीट्सच्या शाखा आहेत. यातील कराची या शब्दावर नांदगावकरांनी आक्षेप घेतला. 

कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर स्पष्ट केले. कराची बेकरी आणि कराची स्वीट्स या ६० वर्षांपासून मुंबईत आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात अर्थ नाही, असे राऊत म्हणाले. दुसरीकडे स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनीही आज मुंबईतील कराची बेकरीसमोर आंदोलन केले. नाव बदलावे ही मागणी निवेदनाद्वारे केली. कराची बेकरीमधील पॅकेट्स बाहेर टाकून निषेध केला. या सर्व प्रकारानंतर दुकानाच्या पाटीवरील कराची नाव दुकानदारांनी कागदाने झाकले

टॅग्स :शिवसेनासंजय राऊत