Join us  

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ! २५ लाखांच्या खंडणी प्रकरणी माजी नगरसेवक फरार, पोलिसांकडून शोध सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 11:44 PM

Maharashtra News: गुन्हे शाखेकडून फरार झालेल्या माजी नगरसेवकाचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: आगामी काळात मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेकविध महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यापासून महापालिका निवडणुका जिंकण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महानगपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनेही कंबर कसली असून, शिंदे गटाचीही साथ भाजपला मिळणार आहे. महापालिकेच्या कारभारावर विरोधकांकडून टीका केली जात असताना ठाकरे गटातील एक नगरसेवक २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. 

भाजपकडून सातत्याने मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहार आणि कारभारावरून शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप अधिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. यातच आता नगरसेवक फरार झाल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात, असे सांगितले जात आहे. 

फरार नगरसेवकाचा पोलिसांकडून शोध सुरू 

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख योगेश भोईर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून, ते या प्रकरणात फरार झाले आहेत. गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध सुरू आहे. एस. डी कॉर्पकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप भोईर यांच्यावर करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश भोईर हे फरार झाल्याचे सांगितले जात आहे. गुन्हे शाखेकडून भोईर यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात भीमसेन यादव या आरोपीला अटक करण्यात आली आहे. योगेश भोईर हे या खंडणी प्रकरणात सहआरोपी आहेत. भीमसेन यादव याला १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस भोईर यांचा शोध घेत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शिवसेनामागाठाणे