शिवसेना लागली कामाला
By Admin | Updated: March 5, 2015 01:52 IST2015-03-05T01:52:47+5:302015-03-05T01:52:47+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या महापालिका निवडणुकांत एकहाती सत्ता मिळवण्याकरिता कामाला लागले आहेत.

शिवसेना लागली कामाला
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या महापालिका निवडणुकांत एकहाती सत्ता मिळवण्याकरिता कामाला लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. सत्तेत सहभागी असूनही सरकारविरोधी भूमिका घेऊन विरोधकांचीच भूमिका वठवत आहेत.
भूसंपादन विधेयकाबाबत मंत्री व आमदारांना माहिती देण्याकरिता शिवसेनेने आज रंगशारदामध्ये सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, की शिवसेना विरोधाकरिता विरोधाची भूमिका कधीच घेत नाही. लोकांनी जाणीवपूर्वक आपल्याला निवडून दिले असून, त्याची जाण ठेवून तळमळीने काम केले पाहिजे. मागील व आताच्या सरकारमध्ये फरक आहे, हे दिसले पाहिजे. नितीन गडकरी यांनी भूसंपादन विधेयकाबाबत भेट घेऊन चर्चा केली. या विधेयकाबाबत शिवसेनेच्या सूचना गडकरी यांच्याकडे सोपवल्या आहेत. आम्ही सरकारच्या निर्णयांना आंधळा विरोध जसा करणार नाही तसाच आंधळा पाठिंबाही शिवसेना देणार नाही.
भूसंपादन कायद्यानुसार आतापर्यंत किती जमीन संपादित केली, जमीन संपादन झालेल्या ठिकाणी किती प्रकल्प पूर्ण झाले, किती लोकांचे पुनर्वसन केले, अशी सर्व माहिती शिवसेनेने मागितली आहे, असे उद्धव यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदर सिंचनाचा हिशेब द्यावा; मग मुंबई महापालिकेत कुठल्या कामाकरिता किती झाडे कापली त्याचा हिशेब मागावा, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
(विशेष प्रतिनिधी)