Join us  

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? शिवसेनेचा महादेव जानकरांना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 10:18 AM

धनगर समाजास घरे, नोकऱ्या, प्रशिक्षण, चुराई अनुदान वैगेरेच्या योजना जाहीर झाल्या. या योजनांना गती देण्यासाठी जानकरांनी सरकारात जोर लावायला हवा. 

मुंबई - संजय दत्त जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वैगेरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे. विनोदाची टवाळी होऊ नये इतकेच. जानकर असेही म्हणाले की, त्यांचा पक्ष कमळ चिन्हावर लढणार नाही. ते सगळे ठीक असले तरी गेली 5 वर्षे त्यांच्या पक्षाचा भुंगा हा कमळ फुलाभोवती पिंगा घालत आहे. मात्र तरीही जानकर बोलले आता हा देखील सौम्य विनोद आहे असे कोणी समजू नये असा टोला शिवसेनेने महादेव जानकारांना लगावला आहे.  

सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी रासपाच्या मेळाव्यावर तसेच संजय दत्त यांच्या कथित रासपा प्रवेशावर भाष्य केलं आहे. राजकारणातील निखळ विनोद संपत चालला आहे कारण राजकारणात त्या तोलामोलाची व्यक्तिमत्वे उरलेली नाहीत. तरीही अधूनमधून विनोद घडत असतात. राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले की, अभिनेता संजय दत्त हे पुढील महिन्यात रासपात प्रवेश करणार आहेत. इतकेच नव्हे तर जानकरांच्या पक्षाचा संजय दत्त जोरदार प्रचारही करणार आहे. मेळावा झाला की नाही याबाबत कुठे फारशा बातम्या आल्या नाहीत पण मेळाव्यातील संजय दत्त प्रवेश करणार या जानकरी दाव्याने मात्र करमणूक झाली आहे. मेळावा धनगर समाजाचा होता व धनगरांच्या अनेक रखडलेल्या प्रश्नांना वाचा फुटले असे वाटेल होते पण मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. सरकारने धनगर समाजासाठी अनेक योजना जाहीर केल्या मात्र त्या आजही कागदावरच आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.  

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे 

  • नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना जाहीर केली व त्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली त्यातील किती वसतिगृहांचे कार्य सुरू झाले?
  • धनगर समाजास घरे, नोकऱ्या, प्रशिक्षण, चुराई अनुदान वैगेरेच्या योजना जाहीर झाल्या. या योजनांना गती देण्यासाठी जानकरांनी सरकारात जोर लावायला हवा. 
  • मुळात धनगर समाजाची आरक्षणाची पूर्ण न झालेली मागणी हा खरे म्हणजे त्या समाजासाठी सगळ्यात ज्वलंत विषय आहे. हे आरक्षण देण्याचं आश्वासनदेखील हवेतच विरले आहे. 
  • विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची वेळ आली तरी धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे तसेच आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व योजना सरकारने लागू केल्या परंतु त्यामुळे आरक्षणाचे महत्व कमी होत नाही. 
  • आता संजय दत्त यांनी पक्षप्रवेश केल्याने धनगर समाजाचे सर्व प्रश्न सुटणार असतील तर त्यांच्या हाती काठी आणि घोंगडे द्यायलाच हवे. मुळात प्रश्न आहे की, धनगर समाजाच्या तरूणांवरील गुन्हे मागे कधी घेणार?
  • धनगर समाजातील किती आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले आणि मागे घेतले नसतील तर त्यामागचे झारीतील शुक्राचार्य कोण हे समजणे गरजेचे आहे. 
  • आज मेंढरांचे वाघ झाले आहेत त्यामुळे आपले हक्क झगडून मिळविण्यासाठी तो सज्ज झाला आहे. 
टॅग्स :महादेव जानकरभाजपाशिवसेनासंजय दत्त