Join us  

उत्तर भारतीय अन् बिहारी लोकांना मारणं, हे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं- विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 2:52 PM

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. यावेळी कांचनगिरी यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते, असं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका त्यांनी केली होती. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं, असं मत देखील कांचनगिरी यांनी व्यक्त केलं होतं. 

कांचनगिरी यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलेलं आहे. परप्रांतियांचा प्रश्न उभा करत उत्तर भारतीयांना मारायचं, बिहारी लोकांची सालटी काढायची हे धंदे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच भाजप राज ठाकरेंना शिवसेनेशी लढण्यासाठी शिखंडीसारखा वापर करत असतील, तर ते योग्य ठरणार नाही. उलट भाजपची सर्व मतं शिवसेनेकडे येतील, असा दावा देखील विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे. 

तत्पूर्वी, बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे, असं कांचनगिरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच राज ठाकरे बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील, असंही कांचनगिरी यांनी स्पष्ट केलं होतं. 

...तर मनसेनं भाजपासोबत जावं-  गुरू माँ कांचनगिरी

राज ठाकरे यांनी भाजपासोबत जावं का? असं विचारण्यात आलं असता कांचनगिरी यांनी महत्त्वाचं विधान केलं. "मी हिंदूराष्ट्रासाठी काम करत आले आहे आणि यापुढेही करत राहिन. राजकाराणाबाबत मला माहित नाही. मी साध्वी आहे. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं. कारण देशात सध्या नवं हिंदुत्व जन्माला येतंय आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटिशांपेक्षाही भारी पडेल. त्यामुळे सर्व हिंदुंनी एकत्र यायला हवं", असं गुरू माँ कांचनगिरी म्हणाल्या होत्या. 

राज ठाकरे अयोध्येला जाणार-

राज ठाकरे यांची डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याची इच्छा असल्याचंही कांचनगिरी यांनी सांगितलं. "राज ठाकरे यांचा डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याचा मानस आहे. आम्ही त्यांचं अयोध्येत मोठं स्वागत करू, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी हिंदूराष्ट्राच्या मजबूतीसाठी अयोध्या दौरा करायला हवा", असं कांचनगिरी म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाविनायक राऊत