Ravindra Waikar Accident :मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मद्यधुंद चालकांमुळे भीषण अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच जोगेश्वरीत ट्रकचालकाने शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला धडक दिली. अपघातावेळी रवींद्र वायकर हे स्वत: गाडीत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातून रविंद्र वायकर हे थोडक्यात बचावले असून पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.
जोगेश्वरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ ट्रक चालकाने रवींद्र वायकर यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने या अपघातात रवींद्र वायकर यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघात घडला त्यावेळी ट्रक चालक वळण घेत होता अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खासदार रवींद्र वायकरांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या अपघातात रवींद्र वायकर यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. वळण घेताना मध्येच एक बाईक आल्याने ट्रक रवींद्र वायकर यांच्या गाडीला धडकला अशी माहिती ट्रक चालकाने दिली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून चालकाने मद्यपान केलं होतं का याचीही तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी घाटकोपर पश्चिम येथील चिराग नगर येथे भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने पाच जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. टेम्पो चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
चालकाच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात चालकाला अचानक फीट आल्याने ही घटना घडल्याचे आढळून आले आहे. पोलीस सध्या चालकाच्या दाव्याची पडताळणी करत आहेत. पोलिसही त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करणार आहेत.