शिवसेना नेत्यांकडून फेरीवाल्यांकडून खंडणी वसुली - मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:08 IST2021-02-06T04:08:11+5:302021-02-06T04:08:11+5:30
मुंबई : शिवसेना नेत्यांकडून मुंबईतील फेरीवाल्यांकडून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी केला. शिवसेनाप्रमुख दिवंगत ...

शिवसेना नेत्यांकडून फेरीवाल्यांकडून खंडणी वसुली - मनसेचा आरोप
मुंबई : शिवसेना नेत्यांकडून मुंबईतील फेरीवाल्यांकडून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी केला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेल्या पावतीवर फेरीवाल्यांकडून दहा रुपयांची वसुली केली जात आहे. विक्रोळीतील शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांचेही यावर फोटो असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला.
‘विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार हे माझे ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते. मी आज पुरावे घेऊन आलोय की विरप्पन गँग कशी खंडणी वसूल करते'', असे सांगत संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेतच शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या सादर केल्या. शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा केली होती; मात्र हॉकर्स झोन झाले नाही. आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देऊन खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा आकार असे या पावतीवर लिहिण्यात आले आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. अशा पद्धतीने वसुलीचा अधिकार यांना कोणी दिला, मुख्यमंत्र्यांची याला संमती आहे का? या दहा रुपयातला कट कुणकुणाला पोहोचतो, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
फेरीवाल्यांना स्पष्टपणे सांगितले जात आहे की, तुम्ही आम्हाला पैसे द्या. महानगरपालिका तुमच्या स्टॉलला हात लावणार नाही. पोलिसांना आम्ही मॅनेज करू. बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरण मंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून वसुली केली जातीय. मला सगळ्यात जास्त दु:ख याचे वाटते की, या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे. अशी खंडणी घेणाऱ्यांना बाळासाहेबांचे लाव लावण्याचा अधिकार उरला नाही, असेही देशपांडे म्हणाले.
मनसे म्हणजे टाईमपास टोळी - आदित्य ठाकरे
फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी गोळा करत असल्याच्या मनसेच्या आरोपांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. मनसे हा पक्ष आहे की संघटना की काय हेच कळत नाही. टाईमपास टोळी असेल. यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्तेही लक्ष देत नाहीत. यांच्याकडे लक्ष देणे गरजेचेही वाटत नाही.
खंडणीखोरीचे आरोप नेहमीच : देवेंद्र फडणवीस
मनसेचे आरोप मला माहिती नाहीत; पण खंडणीखोरीचे आरोप शिवसेनेवर नेहमीच लावले जातात. यात नवीन काही नाही.
तोंडचा घास हप्ता वसुलीने काढण्याचा प्रकार - आशिष शेलार
राम मंदिर उभारण्याच्या निधी संकलनला विरोध करायचा आणि पदपथावरील गरीब माणसांच्या पाठीत खंजीर खुपसून हप्ता वसुली करायची. राम वर्गणीला टीका करायची आणि रस्त्यावर पोट भरणाऱ्या मुंबईकरांच्या तोंडचा घास हप्ता वसुली करून काढून घ्यायचा. या पद्धतीचा मुंबईकरांवरचा कर्दनकाळ ठाकरे सरकार असताना येतोय. याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे.