Join us

भोंग्यावर अजान सुरू होताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:40 IST

काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटवावेत या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक आंदोलन हाती घेतले होते.

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यात शिवसेनाविरुद्धशिवसेना असा वाद रंगला आहे. खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. ८ ऑगस्टपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली. त्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढून ठिकठिकाणी शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. 

मुंबईतल्या चांदिवली भागात आदित्य ठाकरे यांनी निष्ठायात्रा काढत शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्याला प्रचंड गर्दी झाली होती. या मेळाव्यात भाषण करताना मशिदीवरील भोंग्यावर अजान सुरू झाली. आदित्य भाषण करताना हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अजान संपेपर्यंत सभास्थळी शांतता होती. अजान संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली. आदित्य ठाकरेंच्या या कृतीची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. 

काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटवावेत या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक आंदोलन हाती घेतले होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज यांच्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. अजानला विरोध नाही परंतु भोंग्याला विरोध आहे असं सांगत राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने मशिदीवरील भोंगे हटवावेत अशी मागणी केली. त्याचसोबत आमचं सरकार आल्यास मशिदीवरील भोंगे हटवले जातील असं जाहीर केले होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या या भाषणाचा व्हिडिओही शेअर केला होता. इतकेच नाही औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे भोंग्याच्या प्रश्नी बोलत असताना अचानक अजान सुरू झाली. तेव्हा राज यांनी पोलिसांना विनंती करत ताबडतोब हे थांबवा अन्यथा पुढे काय होईल सांगू शकत नाही असा इशारा दिला होता.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?माझे वडील आजारी असताना दुसऱ्याबाजूला हे गद्दार आमदार फोडण्याची तयारी करत होते. माझ्यासोबत कोण येतंय कसं येतंय हे पाहत होते हे तुम्हाला पटणार आहे का?, आमदारांची जमावजमव करण्यास सुरूवात केली. याच गद्दारांना उद्धव ठाकरेंनी ओळख दिली. पाठित खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंचा वाईट काळ सुरू असताना ४० जणांनी सोबत राहायला हवं होतं की गद्दारी करायला हवी होती? असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना विचारला.  

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेराज ठाकरे