Join us  

शिवसेना नेते संजय राऊत बेळगावात दाखल, प्रकट मुलाखत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:08 PM

बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या नाथ पै. व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी संजय राऊत बेळगावात दाखल झाले

कोल्हापूर : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावर संजय राऊतांनी निषेध व्यक्त करताना "मी उद्या (शनिवार) बेळगावात येत आहे, बघू!" असे ट्विट केले होते. त्यानुसार, संजय राऊत दुपारी 3.30 वाजता बेळगावात पोहोचले आहेत.

बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या नाथ पै. व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी संजय राऊत बेळगावात दाखल झाले आहेत. याठिकाणी राऊत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, बेळगाव येथील विमानतळावरच पोलिसांनी राऊत यांना अडवल होते. सुरक्षेच्या कारणास्तव राऊत यांच्याशी पोलिसांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर, राऊत बेळगावला रवाना झाले. भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी १७ जानेवारी १९५६ यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.

बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान, हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे. यावर महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलीसांची धक्काबुक्की केली. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्या पासून रोखले होते. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाबेळगाव