Join us  

उदयनराजेंचा भाजप प्रवेश होताच नरेंद्र पाटील शरद पवारांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 6:03 PM

लोकसभा निवडणुकांवेळी साताऱ्याची जागा शिवसेनेला देण्यात आली होती. शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांवेळी साताऱ्याची जागा शिवसेनेला देण्यात आली होती. शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली.''माथाडी कामगार कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाली. माझे वडील दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती येत्या 25 सप्टेंबरला नवी मुंबईत साजरी होणार आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तत्पूर्वी उदयनराजेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनीही उदयनराजेंचा राजीनामा स्विकारला आहे. त्यामुळे, सातारा लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक घेण्यात येईल. 

देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविले. नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या विचारांशी सहमत असल्यामुळे भाजपा प्रवेश केल्याचे उदयनराजेंनी म्हटले. आता, लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्यात यावी, तसेच लोकसभेला दगाफटका झाल्यास राज्यसभेचे सदस्यत्व मिळावे, या दोन अटी उदयनराजे भोसले यांनी भाजपा श्रेष्ठींपुढे ठेवल्या होत्या, त्या मान्य झाल्याचीही माहिती आहे.

लोकसभा निवडणुकांवेळी साताऱ्याची जागा शिवसेनेला देण्यात आली होती. शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत नरेंद्र पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता, उदयनराजे भाजपकडून पुन्हा सातारा लोकसभेच्या मैदानाता उतरणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? अशी चर्चा सुरू असतानाच नरेंद्र पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. पोटनिवडणुका जाहीर होणे बाकी आहे. त्या जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित बसून पोटनिवडणुकीचा निर्णय घेतील आणि साताऱ्यात पोटनिवडणूक लढवणार हे ठरवतील. साताऱ्याची जागा ही शिवसेनेची आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल”, असेही ते म्हणाले आहेत. तसेच, शरद पवार यांच्या भेटीबद्दलही त्यांनी खुलासा केला आहे. 

''माथाडी कामगार कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाली. माझे वडील दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती येत्या 25 सप्टेंबरला नवी मुंबईत साजरी होणार आहे. शरद पवारांनी माझ्या वडिलांसोबत काम केले आहे. त्यामुळे या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी मी पवारांची भेट घेतल्याचा खुलासाही पाटील यांनी केला आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. ज्या लोकांनी माथाडी कामगार चळवळ जवळून बघितली आहे, त्या लोकांची आम्ही एक व्हिडीओ क्लिप बनवणार आहोत. त्यासाठी अनुभव शेअर करावेत, म्हणून मी पवारांना भेटलो आणि त्यावेळी फक्त व्हिडीओ रिकॉर्डिंगबाबतच चर्चा झाली, असे स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी दिले आहे. 

टॅग्स :सातारासातारा परिसरउदयनराजे भोसलेशिवसेनाशरद पवार