Join us  

'शिवसेना आमचीच... यंदाचा दसरा मेळावा माझ्या जीवनातील सर्वात मोठा कार्यक्रम'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 3:22 PM

यावर्षी दसरा मेळाव्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे. दोन मेळावे होत आहेत, एक बीकेसी ग्राउंडवर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात होत आहे

मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा केवळ दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट आमने सामने आलेले आहेत. दोन्ही गटांकडून आपला मेळावा जोरदार व्हावा यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यासाठी, शिंदे गटाचे नेते, उपनेते मुंबईत दौऱ्यावर आहेत. आमदार शहजीबापू पाटील यांनीही मुंबईत आल्यानंतर शिवसेना आमचीच असे म्हणत आमचाच दसरा मेळावा खरा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा असल्याचं म्हटलं. यंदाचा दसरा मेळावा माझ्या जीवनातला हा सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे मी समजतो. 

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गोरगरीब रुग्णांची सेवा करतात, अशी सेवा करणारे राजकारणातले हे पहिले व्यक्तिमत्व माझ्या जीवनात दिसून आलं, असे शहाजी पाटील यांनी म्हटले. तसेच, यावर्षी दसरा मेळाव्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे. दोन मेळावे होत आहेत, एक बीकेसी ग्राउंडवर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात होत आहे तो हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. तर, ज्यांनी दिवस रात्र जीवाची पर्वा न करता शिवसेना वाढवली त्या आनंद दिघे यांच्या अस्मितेचा मेळावा होत आहे. तर., दुसरीकडे गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतरना केली, अशा शिवसेनेच्या तो मेळावा आहे, अशी टिका शहाजी बापू पाटील यांनी केली. 

शिवसेना आमची आहे

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील मोजकेच काही मुद्दे उचलून बनवलेला टीझर म्हणजेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नाहीत. आज सकाळी मी एक टीझर पाहिला, टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतात आणि निघून जातात. आम्ही शिवसेनेतून गेलोच नाही, शिवसेनाच आमची आहे जे मागे राहिलेत त्यांनी असा विचार करावा. जे तुटपुंज गबाळ राहिले ते ते घेऊन मागे राहायचं का भरदिशी आमच्यात येऊन मिसळायचं हा त्यांचा खरा मनाचा मोठेपणा आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही खरी शिवसेना आहे. हे 50 आमदार आणि बारा खासदारांनी सिद्ध करून दिला आहे. सर्व जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख आणि तळागाळातला शिवसैनिक शिंदे साहेबांकडे यायला लागला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही शिंदेंच्या मागे खंबीरपणे उभी आहे,  फडणवीसांच्या पाठीशी उभी आहे, असेही शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.  

टॅग्स :मुंबईशिवसेनाआमदारदसरा