Join us  

कोकणातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना तातडीने सानुग्रह अनुदान मदत जाहीर करा, शिवसेनेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 8:44 PM

चक्रीवादळाच्या तडाख्यात मासेमारी जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

 - मनोहर कुंभेजकरमुंबई -  गेल्या 1 ऑगस्ट पासून राज्यात मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरवात झाली.मात्र गेल्या 3 महिन्यात आलेल्या तीन चक्रीवादळामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय उध्वस्त झाला आहे.तुफानी वादळात बऱ्याच मच्छिमारांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हवामान खात्याच्या चक्रीवादळाच्या इशाऱ्याने मासेमारी जाळी व साहित्यासह किनारपट्टीवर प्रस्थान केले. मात्र चक्रीवादळाच्या तडाख्यात मासेमारी जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर समुद्र किनारी सुकवण्यासाठी ठेवण्यात आलेली मासळी देखिल खराब झाल्याने फेकून द्यावी लागली.

त्यामुळे या तीन वादळात कोकणातील नुकसान झालेल्या मच्छिमारांना प्रत्येकी 25000 रुपये व नुकसान झालेल्या नौका मालकांना प्रत्येकी 100000 रुपये तातडीने सानुग्रह मदत जाहीर करावी अशी आग्रही मागणी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद,आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी आपल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.याबाबत आमदार प्रभू यांनी लोकमतला सविस्तर माहिती दिली.

पर्ससीन नेट व एलईडी लाईट् मासेमारीने मोठ्या भांडवलदारांनी समुद्गतील मासळी साठा संपुष्टात आणले आहे.त्यामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे देखिल आमदार प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.या तीन चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छिमारांना व नौका मालकांना तातडीने सानुग्रह अनुदान म्हणून मदत करावी अशी मागणी कोळी महासंघ,महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने शासनाकडे यापूर्वी केली आहे.लोकमतने देखिल सदर मागणी सातत्याने मांडली आहे.

मालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टीवर "क्यार" चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झाले आहे.सिंधुदुर्ग मत्स्य विभागातर्फे  मालवण,वेंगुला व देवगड किनारपट्टीवर  पंचनामे सुरू केले आहेत.या पंचनाम्यात नुकसानाची नोंद 7 कोटी 52 हजार इतकी दाखवली आहे.मुखमंत्री उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकरी व मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केल्या नंतर शेतकऱ्यांना तातडीने 25000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याप्रमाणे आपण यावर निर्णयात्मक कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रभू यांनी आपल्या पत्रात केली आहे.

टॅग्स :मच्छीमारकोकणशिवसेना