Join us

'भाजपानं सत्तेचा गैरवाजवी वापर करुन विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 08:12 IST

Devendra Fadnavis: विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरील बहिष्काराचे समर्थन करताना जो युक्तिवाद केला तो बिनबुडाचा आहे.

ठळक मुद्देपंचवीस वर्षे साथ देणाऱया शिवसेनेशी तुमचा संवाद का तुटला याचे उत्तर महाराष्ट्राला द्या.संवाद कौशल्याचे धडे फडणवीस यांनी महाविकास आघाडीस द्यायची गरज नाही105 मध्येही किमान 50 असे आहेत की, ते विचाराने ‘उपरे’ आहेत

मुंबई - भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील ‘105’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल? असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाला टोला लगावला आहे. 

तसेच नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केले. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षात राहणार नाहीत. त्यांच्यामागची ‘माजी’ ही बिरुदावली लवकरच जाईल. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुल्या झाल्या असतीलही, पण महाराष्ट्रात असे काही घडणार नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आता काही राहिलेले नाही, पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकून विधिमंडळ अधिवेशनातील त्यांच्या पक्षाची दिशा ठरवून टाकली आहे. 
  • महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. विरोधी पक्षाने चहापान कार्यक्रमात हजेरी लावून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला हवा होता. राज्याच्या हिताच्या काही सूचना करता आल्या असत्या. शेतकरी, कष्टकरी अशा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला काहीच हरकत नव्हती, पण विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा एकदा आडमुठे धोरण स्वीकारले. 
  • विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरील बहिष्काराचे समर्थन करताना जो युक्तिवाद केला तो बिनबुडाचा आहे. विरोधी पक्षनेत्याने संसदीय लोकशाहीच्या परंपरा राखून काम केले तर तो ‘शॅडो मुख्यमंत्री’ असतो व मुख्यमंत्र्यांइतकेच विरोधी पक्ष नेत्याकडे प्रश्न व माहिती घेऊन लोक तसेच अधिकारी येत-जात असतात, पण फडणवीस या कामात अपयशी होताना दिसत आहेत. 
  • महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये उत्तम परस्पर संवाद आहे आणि कोणत्याही परिस्थितीत विसंवाद होणार नाही याची खात्री महाराष्ट्राला आहे. आघाडीतील सर्व घटक पक्ष सरकार चालवणे व टिकवणे या भूमिकेवर ठाम आहेत. आता हीच जर विरोधी पक्षनेत्यांची पोटदुखी असेल तर आमचा नाइलाज आहे. 
  • महाविकास आघाडीत भिन्न विचारांचे तीन पक्ष एकत्र आले हादेखील एक संवादच आहे, पण भारतीय जनता पक्षाबरोबर हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर पंचवीस वर्षे साथ देणाऱया शिवसेनेशी तुमचा संवाद का तुटला याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. संवादाचे धोरण नीट राबवले असते तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र वेगळे दिसले असते. 
  • संवाद कौशल्याचे धडे फडणवीस यांनी महाविकास आघाडीस द्यायची गरज नाही. संवाद कौशल्याबाबतचे एक शिबीर रामभाऊ म्हाळगी संस्थेत ठेवून त्यात भाजपातील अनेक नेत्यांनी सहभागी व्हावे, असे एकंदरीत वातावरण आहे. 
  • विरोधी पक्षांची सध्या जी धोपटशाही सुरू आहे तोच त्यांचा ‘संवाद’ असेल तर ईश्वर त्यांचे रक्षण करो! विधिमंडळात सरकारला काम करू देणार नाही, असा धोपटमार्ग देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. 
  • फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा भूषवले आहे. एकदा पाच वर्षे व दुसऱयांदा 80 तास. त्या 80 तासांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो, कारण 80 तासांत राष्ट्रपती भवन, राजभवन, गृहमंत्रालय, ईडी, सीबीआय यांच्यामार्फत ‘संवाद’ साधूनही महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त आहे. 
  • भाजपाचे स्वतःचे 105 आमदार आहेत. बाकी इतर कुणी त्यांच्याबरोबर आहेत असे दिसत नाही. या 105 मध्येही किमान 50 असे आहेत की, ते विचाराने ‘उपरे’ आहेत व विरोधी पक्षात राहून काम करण्याची त्यांची भूमिका नाही.  
टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीराज्य सरकार