Join us  

शिवसेना भेकड अन् घाबरट, कंगनाच्या आईचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 9:23 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार, अन्यथा माझ्या मुलीचं समर्थन कोणी केलं असतं, असंही  कंगनाची आई म्हणाली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या जीवाला धोका असल्याचा दावा कंगनाची आई आशा रानौत यांनी केला आहे. शुक्रवारी आज तक यांच्याशी कंगनाच्या आईनं बातचीत केली आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या. आशा राणौत यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, शिवसेना भेकड अन् घाबरट आहे.कंगना रनौतची आई आशा राणौत म्हणाल्या की, संपूर्ण भारत माझ्या मुलीसोबत आहे. असा अन्याय का?, ही बाळासाहेब ठाकरे यांची सेना नाही? ते भेकड, भ्याड आणि घाबरट आहेत. आम्ही त्यांच्यासारखे वंशवादी नाही. कंगनाने गेल्या 15 वर्षांपासून कष्टानं पैसे कमावले आहेत. हे कसले सरकार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार, अन्यथा माझ्या मुलीचं समर्थन कोणी केलं असतं, असंही कंगनाची आई म्हणाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणौत अधिकच संतप्त झाली असून, तिने मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यालयाला भेट देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिले होते. त्यानंतर बुधवारी रात्री कंगनाने शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा डिवचले आहे. मला समोरून नोटीस देण्याची आणि समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही, असा टोला कंगना राणौत हिने लगावला आहे.दुसरीकडे  विमानतळावरील शिवसेनेच्या कामगार युनियनच्या काही सदस्यांनी विमानतळावर भाजपा आणि कंगनाविरोधात घोषणाबाजी केली. या घडलेल्या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती आहे.कंगनाच्या बंगल्यावर कारवाई केल्यानं शरद पवारांची नाराजीअभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई करण्याची वेळ चुकीची आहे. मुंबईत अनेक अवैध बांधकामे आहेत. अशा कारवाईमुळे निष्कारण शंकेची पाल चुकचुकते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. कंगना रणौतवरून सुरू असलेल्या वादावर खा. पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही विधान केले अथवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. कारण मुंबई पोलिसांची कामगिरी सर्वांनाच ठाऊक आहे. प्रसिद्धी माध्यमांनीसुद्धा थोडे तारतम्य बाळगून, अशा गोष्टींना प्रसिद्धी दिली पाहिजे. शहाण्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरे