Shiv Sena breaks Rani's chain on Marine Lines for Coastal Road | कोस्टल रोडसाठी मरीन लाइन्सवरील राणीची माळ शिवसेनेने तोडली

कोस्टल रोडसाठी मरीन लाइन्सवरील राणीची माळ शिवसेनेने तोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मरीन ड्राइव्ह येथील क्वीन नेकलेसची शोभा जाईल म्हणून पर्यावरणपूरक एलईडी दिवे लावण्यास विरोध करणारे आता क्वीन नेकलेसच तोडत आहेत. यामुळे शिवसेनेचा दुटप्पीपणा आणि मुंबईचे बेगडी प्रेम उघड झाल्याची टीका भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत मरीन लाइन्स परिसरात एक किलोमीटरच्या पट्ट्यात भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे क्वीन नेकलेसची माळ तुटल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला. केंद्रातील भाजप सरकारने वीज बचत व्हावी, पर्यावरणपूरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली. तेव्हा क्वीन नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. हे जे ओरडत होते तेच क्वीन नेकलेसची माळच तोडून टाकत आहेत. क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय, या प्रश्नांची शिवसेनेने उत्तरे द्यायला हवीत, असे शेलार म्हणाले. यापूर्वी येथील पारसी गेट तोडण्यात आला. आता समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागाही खाणार. परिसराची शोभा घालवणार.
आता हे तुम्ही करताय ते पुण्य आणि आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप होते का, असा सवाल करतानाच या प्रकरणाने तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड झाले आहे. मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्याला तुमच्या ‘ढोंगीपणाचा गाळ’ दिसला ना, अशा सूचक शब्दांत शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला. दरम्यान, शेलारांच्या आरोपांवर शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे हाताची घडी, तोंडावर बोट धोरण आहे.


सोशल मीडियातील शिवसेना समर्थकांनी मात्र कोस्टल रोडला भाजप सरकारच्या काळातच मान्यता मिळाली. मग, आता विरोधाची भूमिका का, असा सवाल उपस्थित केला. तर, पारसी गेटबाबत पालिका अधिकाऱ्यांनी जो खुलासा केला त्याने पारसी समाज सहमत असल्याचे दावेही शिवसेना समर्थकांनी शेलारांना उत्तरादाखल ट्विटमध्ये केले.


दरम्यान, शिवसेना नेते सचिन अहिर यांनी शेलार यांच्या नव्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१८मध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीसाठी कोस्टल रोड आवश्यक असल्याचे ट्विट शेलार यांनी केले होते. तेव्हा श्रेयासाठी पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या. आता दोन वर्षांत असा काय चमत्कार झाला आणि भूमिका बदलावी लागली, असा प्रश्न अहिर यांनी उपस्थित केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena breaks Rani's chain on Marine Lines for Coastal Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.