Join us  

शिवसेना-भाजपामध्ये जागावाटपाच्या ४ बैठका, युतीची गुप्त चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 7:06 AM

भाजपातर्फे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर शिवसेनतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यामध्ये या बैठका झाल्या.

यदु जोशी

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना भाजपा-शिवसेना युतीची चर्चाच सुरू झालेली नाही, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत तब्बल चार बैठका मुंबईतच झाल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपातर्फे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर शिवसेनतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यामध्ये या बैठका झाल्या. मात्र बैठकीतील चर्चेनंतरही युतीचे घोडे पुढे सरकू शकलेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक बैठकीनंतर त्यांच्या आघाडीतील गुंता सुटत गेला. मात्र युतीतील चर्चेत नेमके उलट घडत असून मुद्दे अधिकाधिक जटील होत चालले आहेत. शेवटच्या बैठकीत तर ‘तुम्हाला काहीच मान्य नसेल तर चर्चा करायची कशाला?’ असा सूर भाजपाकडून लावण्यात आल्याचे समजते. कोणताही गाजावाजा टाळून युतीची चर्चा मुंबईतच, पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी झाली. ही बाब प्रसिद्धी माध्यमांपासून लपवून ठेवण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेने दिलेला जागावाटपाचा फॉर्म्युला भाजपाला मान्य नाही आणि भाजपाने दिलेल्या फॉर्म्युल्यावर युती करण्यास शिवसेना राजी नाही, असे चित्र आहे. युती करायचीच नाही, असे शिवसेनेचे बैठकीत वागणे असते, अशी भाजपाची तक्रार आहे. शिवसेनेला गेल्या वेळी भाजपाने जिंकलेल्या काही जागाही हव्या असून ते भाजपाला अजिबात मान्य नाही. लोकसभा, विधानसभेच्या निम्म्या जागा व अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेना मागत असून, दोन्हींचे जागावाटप आताच जाहीर करा, असेही शिवसेनेचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले.चर्चा कशी करायची?युती करून दोघांच्या जागा वाढविण्याऐवजी काही करून भाजपाचा बदला घेण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.च्बदल्याची भावना ठेवली जाणार असेल तर यापुढे चर्चा कशी करायची, असा सवाल त्याने केला.

टॅग्स :भाजपाशिवसेना