Join us  

'ते' शिवसेना भवन १४ लाखांचं, 'हे' १ कोटीचं... एकदम 'सेम टू सेम'!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 1:31 PM

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हे जसं शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे, तसंच शिवसेना भवन हे तमाम शिवसैनिकांचं स्फूर्तिस्थान आहे.

मुंबईः दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ अगदी दिमाखात उभं असलेलं शिवसेना भवन आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण, सध्या हैदराबादमधील सेनाभवन विशेष लक्षवेधी ठरतंय. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सिनेमासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्चून सेनाभवनाचा भव्य सेट एका स्टुडिओमध्ये साकारण्यात आला आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे, दादरच्या सेनाभवनाची मूळ वास्तू १४ लाख रुपयांमध्ये (अर्थात त्या काळचे) उभारण्यात आली होती आणि आता सेटची किंमत आहे एक कोटी.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हे जसं शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे, तसंच शिवसेना भवन हे तमाम शिवसैनिकांचं स्फूर्तिस्थान आहे. १९ जून १९७७ पासून दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ 'शिवसेना भवन'ची दगडी वास्तू - एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी उभी होती. २००६ पासून तिथे नवं, अद्ययावत सेनाभवन उभं आहे आणि शिवसेनेचा प्रशासकीय कारभार तिथूनच चालतो. परंतु, आता शिवसेना भवनची जुनी वास्तू तरुण शिवसैनिकांना पाहता येणार आहे. या वास्तूची हुबेहूब प्रतिकृती हैदराबादमधील स्टुडिओत उभी राहिलीय. काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी ती सोशल मीडियावर शेअर केली होती. हा सेट उभारण्यासाठी १ कोटी रुपयांचा खर्च आल्याचं समोर आलंय. 

बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चरित्रपटाची निर्मिती संजय राऊत करताहेत. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका करतोय. त्याची झलक पाहून सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सिनेमा भव्य दिव्य असेल, याची कल्पना प्रोमोमधून आली होतीच. पण आता सेना भवनाच्या सेटची किंमत कळल्यानं त्यावर शिक्कामोर्तबच झालं आहे. 

 

टॅग्स :शिवसेना वर्धापनदिनशिवसेनाबाळासाहेब ठाकरेनवाझुद्दीन सिद्दीकी