Join us  

गुंता सोडवा, मग बोला, स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:01 AM

प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजाराचे रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा जसा गोंधळ उडतो तसा तो भाजपामध्ये उडालेला दिसत आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वत:च केलेल्या गुंत्यात फसू नये फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दुषणे देत आहेत. मग शिवसेनेसोबत जाऊन राज्याचे हित कसे साधणारराज्यात सध्या जी व्यवस्था सुरू आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि ती व्यवस्थाही राज्याच्या हिताची

मुंबई  - भारतीय जनता पक्षाने काल झालेल्या बैठकीत राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होण्याचा आणि पुढील निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, या घोषणेवरून शिवसेनेने भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे. भाजपाची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित आहे, या भ्रमात भाजपा नेत्यांनी राहू नये. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजाराचे रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा जसा गोंधळ उडतो तसा तो उडालेला दिसत आहे. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वत:च केलेल्या गुंत्यात फसू नये, असा चिमटा शिवसेनेने सामनामधील अग्रलेखातून लगावला आहे.

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी यांनी काल राज्यातील पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, अशी सूचना दिली होती. त्यावरून सामनाधून नड्डा आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात भाजरपा हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी असा आक्रमक पवित्रा घेणे चुकीचे नाही. राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, राज्याच्या हिताच्या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडावे, ते जोग्यच आहे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याची गरजही नव्हती. मात्र नड्डा यांनी सांगण्यापूर्वी विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावली होती. पण तोफांना निशाणा साधताच आला नाही. भाजपाने आक्रमणाच्या तोफा फक्त महाराष्ट्रातच उडवल्या असे नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही त्यांनी तोफांच्या नळकांड्यांना बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुंतलेले दिसत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत, सांगण्याची गरज नाही, असा टोलाही या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार हे स्वार्थासाठी स्थापन झाल्याचे नड्डा म्हणाले.  मात्र भारतीय जनता पक्ष सध्या जे राजकारण करत आहे ते असे कोणते परमार्थाचे लागून गेले आहे. मध्य प्रदेशात काय संतसज्जनांचा मेळा जमवून सरकार पाडले गेले नाही. राजस्थानमध्येही मंत्रोच्चार  वगैरे करून तेथील सरकार अस्थि केले नाही. तर सरळ सरळ पैशांचा वारेमाप वापर करून आवश्यक ते बहुमत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रावर टीका करण्याआधी हे सत्य स्वीकारावे, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरूनही सामनामधून भाजपाला चिमटा काढण्यात आला आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, असे बालीश विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्याचे हित म्हणजे नेमके काय, भाजपाला मुख्यमंत्रिपद मिळाले तरच राज्याचे हित अन्यथा नाही. दुसरीकडे फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दुषणे देत आहेत. मग शिवसेनेसोबत जाऊन राज्याचे हित कसे साधणार, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरू आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि ती व्यवस्थाही राज्याच्या हिताची आहे, असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

टॅग्स :शिवसेनाभाजपा