तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाल्यापासून दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमधून विस्तव देखील जात नाही आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या या दोन्ही गटांमध्ये वर्चस्वासाठी टोकाचा संघर्ष झाला होता. दरम्यान, आता काही महिन्यांवर आलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबईत वर्चस्व राखण्यावरून दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. तसेच तावरून वातावरण तापत असून, काल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबईमधीलप्रभादेवी परिसरात किरकोळ कारणावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे दोन्ही गट आमने सामने आले.
प्रभादेवी सर्कल परिसरातील सुशोभिकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या या दोन्ही गटांमध्ये वादाला तोंड फुटले. येथील कामाची वर्क ऑर्डर आपल्यालाच मिळाल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यावरून वादावादी झाली. तसेच दोन्हीकडचे शिवसैनिक एकमेकांना भिडले.
दरम्यान, येथील कामासाठी आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे. त्यामुळे आम्ही काम करत होतो. तसेच आम्हाला निधीही मिळालेला आहे. मात्र काही लोक आम्ही जिथे काम केलं आहे तिथे रंगरंगोटी करून आपली नावं लावत आहेत, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी केला. आता या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच याबाबत पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.