शिवसैनिकांना वाटते आत्मसन्मानाची चिंता
By Admin | Updated: October 30, 2014 01:55 IST2014-10-30T01:55:45+5:302014-10-30T01:55:45+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिपदाकरिता उत्सुक असलेल्या शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांना भाजपाप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्यात रस आहे.
शिवसैनिकांना वाटते आत्मसन्मानाची चिंता
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिपदाकरिता उत्सुक असलेल्या शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांना भाजपाप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्यात रस आहे. मात्र काही मोजकेच नेते व बहुतांश शिवसैनिकांमध्ये भाजपा सध्या शिवसेनेला देत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप असून शिवसेनेने विरोधी पक्षात बसावे, अशी इच्छा आहे. या कात्रीत सापडलेल्या शिवसेनेने गुरुवारी दुपार्पयत आपला निर्णय लांबणीवर टाकला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवसभर शिवसेनेचे नेते व समाजातील वेगवेगळ्य़ा घटकांशी चर्चा केली. शिवसेनेतील नेत्यांना भाजपाप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. आपल्याला चार-सहा मंत्रिपदे मिळाली तरीही सरकारमध्ये सहभागी झाले पाहिजे, असे काही नेत्यांचे मत आहे. मात्र सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनेच्या भूमिकेबाबत सहानुभूती राखणा:या काही मान्यवरांनी विरोधी पक्षात बसण्याचा पर्याय स्वीकारावा, असे ठाकरे यांना सुचवले. शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी मुखपत्रतून सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता अचानक त्यापासून घूमजाव करून विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेणो उचित दिसणार नाही, असे ठाकरे यांचे मत आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन भाजपा सरकार स्थापन करील की नैतिक पेच टाळेल, याकडे शिवसेना लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे शिवसेना मेटाकुटीला येईल आणि मिळेल ते स्वीकारून सरकारमध्ये येईल, असे भाजपाला वाटते. शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना टाळून दिल्लीतील नेत्यांबरोबर चर्चेचा आग्रह धरला आहे. त्यामुळे राज्यातील नेते काखा वर करीत आहेत तर दिल्लीतील नेते आपल्याकडे शिवसेनेकडून कुठलाच प्रस्ताव आलेला नाही, असे
सांगून शिवसेनेची कोंडी करीत
आहेत. (विशेष प्रतिनिधी)