Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतल्या गोरेगावमधील शिवसैनिक दहीहंडीचा खर्च केरळ पूरग्रस्तांना देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 14:28 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत पोलीस आणि महापालिका यांना दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी द्यावी लागते.

मनोहर कुंभेजकरमुंबई- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत पोलीस आणि महापालिका यांना दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी द्यावी लागते. मात्र जर सदर मंडळे न्यायालयाच्या आदेशाचे जर पालन करत नसतील तर मग मात्र पोलीस व पालिकेला कायद्याचे पालन करत मंडळांना परवानगी नाकारावी लागते. गोरेगाव पश्चिम सिद्धार्थ हॉस्पिटलजवळ साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. या उत्सवाला येणारा खर्च केरळ पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.शिवसेनेचे नेते दिलीप शिंदे म्हणाले, गेली 25 वर्षे शिवसेनेच्या वतीनं दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मुंबई ठाण्यातील 100 हून अधिक गोविंदा पथके येथे सलामी देतात. त्यांना प्रत्येकी 1000 रुपये आणि दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख 11 हजारांचे बक्षीस आम्ही देणार होतो. मात्र यंदा आमचा दहीहंडी उत्सव हा पालिकेच्या सिद्धार्थ हॉस्पिटल जवळ आणि शांतता क्षेत्रात येत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन निर्देशानुसार गोरेगाव पोलिसांनी ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर निर्बंध घातले होते. गोरेगाव पोलिसांनी आमच्या दहीहंडीला परवानगी नाकारली.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शिवसैनिकांनी एकमताने शिवसेना शाखा क्रमांक 58 आयोजित आजचा दहीहंडी उत्सव  रद्द केला. पुढील वर्षी दुसऱ्या जागेत धूमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचंही शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं आहे. तसेच रद्द करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवावरचा खर्च केरळ पूरग्रस्त निधी म्हणून देण्याचं शिवसैनिकांनी सांगितलं आहे. केरळ पूरग्रस्त निधी लवकरच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. शिवसेना शाखा क्रमांक 58 ने घेतलेल्या या निर्णयाचे गोरेगावकरांनी स्वागत केले. 

टॅग्स :शिवसेना