मुंबई
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मागाठाणे मतदारसंघावर पुन्हा एकदा शिंदेसेनेचा प्रकाश पसरला आहे. शिंदेसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांनी उद्धवसेनेच्या उदेश पाटेकर यांच्यावर ५८१६४ मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. सुर्वे यांना १०५५२७ मते मिळाली तर पाटेकर यांना ४७३६३ मते मिळवता आली. तिसऱ्या स्थानावर असलेल्या मनसेच्या नयन कदम यांना २१२९७ मते मिळाली.
यावेळी उद्धवसेनेचे पाटेकर कडवी झुंज देतील अशी अपेक्षा असताना सुर्वे यांनी सहज विजय मिळवला. मराठी भाषिक मतदारांचे प्राबल्य असल्याने शिवसेना आणि मनसे यांचा प्रभाव या मतदारसंघावर होता. शिंदेसेनेचे प्रकाश सुर्वे यांनी हॅट्ट्रिक साधत आपणच मागाठाण्याचे सरदार असल्याचे सिद्ध केले आहे.
२००९ मध्ये मनसेच्या प्रवीण दरेकर यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांना विजयाची संधी मिळाली. दरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने हा मतदारसंघ राखला आहे. मराठी मतांचे विभाजन काही प्रमाणात पाहायला मिळाले मात्र, सुर्वे यांना एक गठ्ठा मते मिळाल्याचे दिसते. प्रकाश सुर्वे हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना मतदारांच्या रोषाचा काही प्रमाणात सामना करावा लागेल अशी स्थिती होती. मात्र, मतदारसंघातील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या पुनर्विकासाचे प्रश्न हाताळण्यात, नागरी सुविधांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा तसेच लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद सुर्वे यांचा विजय सुकर करणारा ठरला.
प्रकाश सुर्वे- १,०५,५२७उदेश पाटेकर- ४७,३६३नयन कदम- २१,२९७