मुंबई-वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक मतदान केले होते. मुंबईतील २४ विधानसभा मतदार संघात महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त होता. ही आकडेवारी पाहता शिंदे सेनेने महिला मतदारांसाठी खास रणनिती तयार केली आहे. पालिका निवडणुकीत महिलांचे मतदान वाढावे, यासाठी महिला आघाडीकडून विविध उपक्रम घेतले जात आहेत. लाडक्या बहिणींमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करणारी शिंदे सेनेची महामंगळागौर स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. यात तब्बल ६००० महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भारती विद्या भवन येथे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
महामंगळागौर स्पर्धेत मागाठाणे येथील कलादर्पण गटाने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक भायखळा येथील शिवकन्या आणि तृतीय क्रमांक चेंबूर येथील चंद्रकोर गटाने पटकावला. “उत्सव मुंबईचा” सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत हनुमान सेवा मंडळाने पहिला क्रमांक पटकावला. निकदवरी लेन सार्वजनिक मंडळ (गिरगावचा राजा) आणि ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्दीचा राजा) यांना संयुक्तरित्या दुसरा क्रमांकाने गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक भांडुप येथील कोकण मित्र मंडळ आणि शिवाजी पार्क (हाऊस) यांना संयुक्तरित्या देण्यात आला. स्पर्धांचे आयोजन शिंदे सेनेच्या नेत्या मीना कांबळी, उपनेत्या, प्रवक्त्या, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिंदे सेनेचे सचिव व शिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. “उत्सव मुंबईचा” या स्पर्धेत मुंबईतील ४५० गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. यात ५० गणेश मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.
राज्यात लाडकी बहिण योजनेला यश मिळाल्यानंतर शिवसेनेकडून महिला वर्गासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. शिंदे सेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना लागू केली होती. या योजनेच्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत महिला मतदानाचा टक्का वाढला. या वाढीव मतदानाचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. महायुतीचे एकूण २३५ आमदार निवडून आले. यात शिवसेनेचे ६० आमदार होते. विधानसभा निवडणुकीत मुंबईत एकूण ५५.४६ टक्के मतदान झाले होते. यात महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. मुंबईतील ५५.९२ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर ५५.०७ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले होते. मुंबईतील २४ विधानसभा मतदार संघात महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त होता. त्यामुळे यंदा महिला मतदार मुंबई महापालिका निवडणुकीचा केंद्रबिंदू असतील. महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत करत शिंदे सेनेकडून विविध उपक्रम राबवले जात असल्याचे शीतल म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले.
महिला आघाडी ही आमच्या पक्षाची अविभाज्य घटक आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकियरित्या सक्षम करण्याचे काम पक्षाकडून केले जात असल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या. आगामी निवडणुकीसाठी महिला आघाडी सज्ज आहे. महिला आघाडी ही शिंदे सेनेची ताकद असून महिलांच्या मनात आले तर त्या काय चमत्कार करु शकतात, हे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. त्यामुळे आता येत्या महापालिका निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी विरोधकांना त्यांची जागा दाखवतील दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Web Summary : Shinde Sena focuses on women voters for Mumbai's upcoming municipal elections. Initiatives like 'Mahamanglagaur' and Ganesh Utsav competitions saw huge female participation. Following the success of 'Ladki Bahin' scheme, the party aims to replicate increased female voter turnout to secure victory.
Web Summary : शिंदे सेना का मुंबई नगर निगम चुनाव में महिला मतदाताओं पर ध्यान केंद्रित है। 'महामंगलागौर' और गणेश उत्सव प्रतियोगिताओं जैसी पहलों में महिलाओं की भारी भागीदारी देखी गई। 'लाडकी बहिन' योजना की सफलता के बाद, पार्टी बढ़ी हुई महिला मतदाता मतदान को दोहराकर जीत हासिल करने का लक्ष्य रखती है।