शिंदेसेनेचा दावा, जागा वाटपात भाजप वेटिंगवर ; कुर्ला, कलिना आणि चांदिवलीत काय होणार?
By सचिन लुंगसे | Updated: December 26, 2025 09:43 IST2025-12-26T09:43:29+5:302025-12-26T09:43:37+5:30
मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला.

शिंदेसेनेचा दावा, जागा वाटपात भाजप वेटिंगवर ; कुर्ला, कलिना आणि चांदिवलीत काय होणार?
- सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुर्ला, कलिना आणि चांदिवली या अल्पसंख्यकांच्या विधानसभा मतदार संघातील बहुतांश प्रभागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे. त्यामुळे येथील जागा वाटपात भाजप बॅकफूटवर आहे. दुसरीकडे भाजप-शिंदेसेनेचा जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने येथील भाजपच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी ‘देव पाण्यात’ ठेवले आहेत, तर अनेकांनी अपक्ष म्हणून लढण्याचीही तयारी केल्याचे राजकीय सुत्रांनी सांगितले.
मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला. प्रभाग क्रमांक १६६चे माजी नगरसेवक म्हणून तुर्डे यांचा उमेदवारीचा दावा कायम आहे, तर विधानपरिषदेचे आ. राजहंस सिंह यांचा मुलगा नितेश सिंह हे भाजपमधून इच्छूक असून, हे पिता-पुत्र पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. ही जागा कुणाला सुटते, यावर संजय आणि नितेश यांचे भवितव्य अवलंबून असून, हा प्रभाग खुला असल्याने येथून तुर्डे यांच्या पत्नी मीनल यांचा उमेदवारीसाठी प्रबळ दावा आहे. दुसरीकडे याच प्रभागात भाजपकडून तीन नावे चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आमदारांचे प्राबल्य किती, यावर उमेदवारांचे भवितव्य
उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाल्यानंतर आता उमेदवार कोण असणार? हे जागा वाटपावर ठरणार आहे. कलिनाचे उद्धवसेनेचे आ. संजय पोतनीस यांचे प्राबल्य किती, यावरही उर्वरित उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
कुर्ल्याचे शिंदेसेनेचे आ. मंगेश कुडाळकर यांनीही येथील जागांवर शिंदेसेनेचा दावा कायम ठेवला आहे. या भागात उद्धवसेनेचीही ताकद आहे. त्यामुळे त्यांना वेगळी रणनिती आखावी लागेल. चांदिवलीत शिंदेसेनेचे आ. दिलीप लांडे यांनीही युतीत भाजपपेक्षा अधिक जागा मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे.
हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. माजी आ. नसीन खान येथून दोन वेळा पराभूत झाल्याने येथे काँग्रेसची पकड ढिली झाली आहे. महायुती त्याचा कसा फायदा उचलते, त्यावर येथील गणित अवलंबून असेल.
आमचा कुर्ला आणि चांदिवलीत जास्तीत जास्त जागांवर दावा आहे. जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असे शिंदेसेनेेचे कुर्ला मतदारसंघाचे आ. मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.