शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणखी गोत्यात
By Admin | Updated: March 17, 2015 01:07 IST2015-03-17T01:07:30+5:302015-03-17T01:07:30+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी समभागाच्या मूल्यांकनात गडबड केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने दोघांनाही नोटीस बजावली आहे.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणखी गोत्यात
डिप्पी वांकाणी - मुंबई
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स फ्रेंचायजीचे सहमालक अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी समभागाच्या मूल्यांकनात गडबड केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने दोघांनाही नोटीस बजावली आहे. मॅच फिक्सिंगचा धुरळा पुरता विरण्याच्या आतच या कथित आर्थिक घोटाळ््याची चौकशी सुरु झाल्याने शिल्पा आणि राज आणखी गोत्यात आले आहेत.
फ्रेंचाईजीच्या अचानक किंमती वाढलेल्या शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. फ्रेंचाईजी स्थापनेच्यावेळी कमी किंमती दाखविलेल्या समभागाच्या (शेअर्स) किमती स्थापनेनंतर अचानक भरमसाठ वाढल्याचे निदर्शनास आल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय राजस्थान रॉयल्सने सोमवारी ‘फेमा’च्या नियमभंग प्रकरणी एकूण १०० कोटी रुपयांच्या दंडापैकी १५ कोटींचा भरणा केला.
अंमलबजावणी संचालनालयाच्या एका उच्च अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, फ्रेंचाईजी स्थापनेपूर्वी कमी किंमत दाखवलेले समभाग एकाएकी मोठ्या फरकाने वधारले, हा संशयास्पद बदल लक्षात घेऊन नोटीस बजावली आहे. कमी मूल्यांकन दाखविल्याने स्थापनेवेळी मोठ्या किमतींचा व्यवहार त्यांना सोयीस्कर जाणार होते आणि कागदोपत्री व्यवहार पूर्ण होईपर्यंत त्यांचे समभाग सामान्य किमतीवर कायम राहिले. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज ईलेव्हन पंजाब या फ्रेंचाईजींची चौकशी करीत असताना ही बाब समोर आली. या फ्रेंचाईजीचे पदाधिकारी किंवा प्रवर्तकांचे म्हणणे ऐकल्यांनतरच त्यांचे स्पष्टीकरण नोंदविण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.