Join us

भाड्याच्या खोलीतून थेट करोडोंच्या घरात, शिवसेना शाखाप्रमुख शिर्केंना लागली पाच कोटींची दोन घरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 07:10 IST

उच्च उत्पन्न गटाच्या यादीतील संकेत क्रमांक ३६७ मधील एकमेव घर (किंमत ५ कोटी १३ लाख) विनोद शिर्के यांना जाहीर झाले.

अजय परचुरेमुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वाधिक उत्सुकता होती ती ग्रँट रोड-धवलगिरी येथील ३ सर्वात महागड्या (५ कोटी रुपये) घरांची. आग्रीपाडा शाखा क्रमांक २१२ चे शाखाप्रमुख विनोद शिर्के यांना या महागड्या घरांपैकी तब्बल दोन घरे लॉटरीत लागली आहेत.

उच्च उत्पन्न गटाच्या यादीतील संकेत क्रमांक ३६७ मधील एकमेव घर (किंमत ५ कोटी १३ लाख) विनोद शिर्के यांना जाहीर झाले. त्यानंतर लगेचच संकेत क्रमांक ३६८ मधील एकमेव घराच्या लॉटरीतही विनोद शिर्के यांचेच नाव स्क्रीनवर झळकले आणि सगळीकडे फक्त शिर्के यांच्या नावाचीच चर्चा सुरू झाली. संकेत क्रमांक ३६८ मधील या घराची किंमत ५ कोटी ८० लाख रुपये आहे. मात्र, म्हाडाच्या नियमानुसार एका अर्जदाराला दोन घरे लॉटरीत लागल्यास एक घर परत करावे लागते. त्यानुसार विनोद शिर्के दोन्हीपैकी कोणते महागडे घर म्हाडाकडे परत करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विनोद शिर्के हे आग्रीपाडा विभागातील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून काम करतात. गेली १७ वर्षे ते आयटी कन्सलटंट म्हणून कार्यरत आहेत. ज्यात त्यांनी ११ वर्षे आयबीएम, तर पुढची ६ वर्षे टीसीएस कंपनीत आयटी कन्सलटंट म्हणून काम पाहिले आहे. २०१४ पासून ते शिवसेनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. विनोद शिर्के पत्नी, सहा वर्षांची मुलगी आणि सासू-सासरे यांच्यासमवेत आग्रीपाड्यातील बीआयटी चाळ क्रमांक २९ मध्ये वास्तव्यास आहेत.मी १९९९ पासून दरवर्षी म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज करत होतो. मला दोन घरे जाहीर झाल्याची बातमी कळली तेव्हा मी पक्षाच्या कामात व्यस्त होतो. मी म्हाडाच्या नियमानुसार यातील एक घर परत करणार आहे. मात्र कोणते घर परत करायचे, याविषयी मी अजूनही निर्णय घेतला नाही. भाड्याच्या खोलीतून हक्काच्या घरात जाण्याचा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय आहे.- विनोद शिर्के, शिवसेना शाखाप्रमुख तथा म्हाडा लॉटरी विजेता

टॅग्स :मुंबईम्हाडाशिवसेना