Join us  

‘ती’ स्कॉर्पिओ तीन महिने सचिन वाझेंनीही वापरली !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 5:14 AM

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने एटीएसकडे केली तक्रार, चाैकशीसाठी गेले ते घरी पुन्हा परतलेच नाहीत

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेली स्कॉर्पिओ तीन महिने गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांच्याकडे हाेती, अशी धक्कादायक माहिती मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी केलेल्या तक्रारीतून समोर आली. वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा संशयही त्यांनी एटीएसकडे वर्तवला.

विमला यांनी एटीएसकडे केलेल्या तक्रारीनुसार, डॉ. पीटर न्यूटन यांच्या मालकीची असलेली स्कॉर्पिओ गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे पती वापरत होते. त्यांच्या ओळखीतील वाझे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ती कार वापरण्यासाठी नेली आणि ५ फेब्रुवारीला चालकामार्फत परत पाठवली.त्यानंतर १७  फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिरेन हे ठाणे येथून कारमधून मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा कार मध्येच बंद पडल्याने ती तेथेच ठेवून ते ओलाने पुढे गेले. १८ फेब्रुवारीला तेथे कार नसल्याने त्यांनी विक्रोळी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर २५ फेब्रुवारीला कार सापडल्यानंतर हिरेन यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचे विमला यांनी सांगितले.

२६ फेब्रुवारीला वाझेंसोबत ते चौकशीसाठी गुन्हे शाखेत गेले. तेथून रात्री साडेदहा वाजता वाझेंसोबतच घरी परतले. पुढे २७ आणि २८ फेब्रुवारीला पुन्हा वाझेंसोबत चौकशीसाठी गेले. त्यांचा जबाब नोंदवून झाल्यानंतर त्याची कॉपी देण्यात आली. पती पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करत हाेते. वाझे यांनीच त्यांची हत्या केल्याचा संशय विमला यांनी वर्तवला. 

अटक व्हा, मी सोडवतो, असे वाझेंनी सांगितले!३ मार्च रोजी हिरेन नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतले. रात्री ९च्या सुमारास दुकानात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, ‘वाझेंनी या गुन्ह्यात अटक व्हा, दोन ते तीन दिवसांत जामिनावर बाहेर काढतो’, असे सांगितले. मात्र, चूक नसताना अटक होण्याची गरज नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावेळी ते तणावात हाेते, असे विमला यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

वाझेंच्या सांगण्यावरूनच आयुक्तांकडे तक्रारपती कधीही दबावाखाली नव्हते, त्यांना कधी कोणी मारहाणही केली नाही. घडलेली प्रत्येक गाेष्ट ते घरी सांगत. वाझेंच्या सांगण्यावरूनच त्यांनी पाेलीस आणि माध्यमांकडून त्रास होत असल्याची तक्रार आयुक्तांकडे केल्याचे विमला यांनी तक्रारीत म्हटले.

तो मास्कही गायबघराबाहेर पडताना पतीच्या तोंडावर साधा मास्क होता. मोबाइल फोन, दीड तोळ्याची चेन, अंगठी, पैशांचे पाकीट, ५ ते ६ एटीएम कार्डे होती. मात्र मृतदेह आढळला तेव्हा त्यापैकी काहीही सापडले नाही. त्यांच्या तोंडावर स्कार्फ होता. पती हिरेन चांगले स्वीमर असल्याने त्यांचा बुडून मृत्यू होऊच शकत नाही. त्यांची हत्याच झाल्याचा संशय विमला यांनी वर्तवला.

आपलेच पोलीस आहेत म्हणत घराबाहेर पडले४ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास पती हिरेन दुकानावरून लवकर घरी परतले. त्यांच्याकडे विचारणा करताच, त्यांनी कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या व्यक्तीने कॉल करून भेटण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. आपलेच पोलीस आहेत, त्यांचा सल्ला घेण्यासाठी घोडबंदरला स्वत:च्या दुचाकीवरुन नव्हे तर रिक्षानेच जाणार असल्याचे सांगितले. मुलाला दुकानात थांबवून ठेवले. रात्री साडेनऊला मुलगा घरी आला तेव्हा वडील अजून घरी का आले नाहीत, याची त्याने चौकशी केली. दिराकडेही विचारणा केली. रात्री ११ वाजेपर्यंत वाट बघितली. त्यानंतर त्यांना फाेन केला. मात्र ताे बंद हाेता. वाझेंकडेही वडिलांबाबत विचारणा केली. त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. अखेर दुसऱ्या दिवशी नौपाडा पोलिसांत तक्रार दिल्याचे विमला यांनी तक्रारीत नमूद केले.

तपास पूर्ण हाेण्याआधीच मनसुख हिरेन यांचा मृत्यूnअंबानी यांचे निवासस्थान अँटिलियापासून ५०० मीटर अंतरावर, २५ फेब्रुवारी रोजी, महिंद्रा स्कॉर्पिओत २० जिलेटिनच्या  कांड्या व धमकीचे पत्र सापडले. nत्याचा तपास पूर्ण हाेण्यापूर्वीच चोरलेल्या या कारचे मूळ मालक हिरेन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी वाझेे यांनीच त्यांची हत्या केल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :मुंबईमनसुख हिरणगुन्हेगारी