यापेक्षा शेळ््यामेढ्यांची स्थिती चांगली
By Admin | Updated: May 20, 2015 02:08 IST2015-05-20T02:08:12+5:302015-05-20T02:08:12+5:30
मुंबईकरांपेक्षा शेळ्यामेंढ्या बऱ्या, अशी प्रतिक्रिया माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

यापेक्षा शेळ््यामेढ्यांची स्थिती चांगली
मुंबई : मुंबईकरांची दररोज लोकलमधून कामावर जाताना वाईट अवस्था होत असून घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांपेक्षा शेळ्यामेंढ्या बऱ्या, अशी प्रतिक्रिया माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. रेल्वे अपघात आणि प्लॅटफॉर्म उंची यासंदर्भात संसदीय समिती दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आली असून या समितीत त्रिवेदी आहेत.
पंधरा खासदारांची असलेल्या या समितीने सकाळी अकराच्या सुमारास भांडुप आणि त्यानंतर बाराच्या सुमारास घाटकोपर स्थानकात भेट देऊन पाहणी केली. या समितीचे सदस्य आणि माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी हे समितीतील सदस्यांसोबत घाटकोपर स्थानकात आले असता दुपारीही असलेली प्रचंड गर्दी पाहून अवाक झाले. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय रेल्वेला अद्याप कोणीही समजू शकले नसल्याचे मत व्यक्त केले. कधी काळी आपल्या मागे असलेला चीन हा आज शंभर वर्षे पुढे गेला आहे. त्याचप्रमाणे आपण एकीकडे चांद्रायनही पाठवत आहोत. अशातच कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची लोकलमधून प्रवास करताना वाईट अवस्था होत असल्याचे सांगत मुंबईकरांपेक्षा शेळ्यामेंढ्या बऱ्या, अशी प्रतिक्रिया त्रिवेदी यांनी दिली. सर्वसामान्यांना सुरक्षित प्रवासाची गरज असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)