‘ती’ २७ गावे केडीएमसीतच
By Admin | Updated: May 15, 2015 23:17 IST2015-05-15T23:17:38+5:302015-05-15T23:17:38+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास विरोध करणारी भूमिका २७ गावांतील ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी कोकण भवन येथे आक्रमकपणे

‘ती’ २७ गावे केडीएमसीतच
अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास विरोध करणारी भूमिका २७ गावांतील ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी कोकण भवन येथे आक्रमकपणे मांडली असली तरी कोणत्याही परिस्थितीत ही गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतच समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्याला जाण्यापूर्वी याबाबतच्या अधीसूचनेवर स्वाक्षरी केल्याचे समजते. या गावांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्यासाठी १ जूनचा मुहूर्त असून त्यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अध्यादेशाची प्रतीक्षा आहे.
२७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याला संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे. महापालिकेत गावे समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हरकती व सूचना मांडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. असे असले तरी ही गावे कडोंमपात सहभागी करून घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे राज्य सरकारचे मत आहे. या गावांचा महापालिकेत समावेश करून विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसंबंधी एक विशिष्ट प्राधिकरण नेमण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका केली तर या गावांसाठी स्वतंत्र यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, विकासनिधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची व्यवस्था अडकून पडेल. त्यामुळे उपलब्ध व्यवस्थेत 'उरकून' घेण्यासाठी शासन गावे पालिकेत समाविष्ट करण्यासाठी आग्रही असल्याचे सूत्राने सांगितले.
या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यास येत्या निवडणुकीसाठी येथील प्रभागांची रचना करण्याची कार्यवाही लवकर सुरू करणे शक्य होईल, अशी माहिती एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने
दिली.
महापालिकेच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस होतील, अशी शक्यता आहे. तत्पूर्वी प्रभाग रचना ठरविण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे २७ गावांसंबंधीचा निर्णय येत्या महिनाभरात करावाच लागेल, असा दावा प्रशासकीय वर्तुळात केला जात आहे.