Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Ponkshe: म्हणून शिंदे गटात जाण्याचा निर्णय योग्यच होता, शरद पोंक्षेंनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 18:37 IST

शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथील कार्यक्रमात अहिंसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकांची झोड उठली होती.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आपल्या आक्रमक भाषण शैलीवरून चर्चेत आहेत. तर, काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर, शिंदे गटाचे समर्थन केल्यामुळे शिवसेना आणि त्यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं. विशेष म्हणजे शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यात कलगीतुराही पाहायला मिळाला. आता, पुन्हा एकदा शरद पोंक्षेंनी ट्विट करुन अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथील कार्यक्रमात अहिंसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकांची झोड उठली होती. हिंदू समाज अहिंसक होता, नपुंसक कधी झाला समजलच नाही. आम्हाला राग येत नाही, चीड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवलाच नाही. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळाले, हे आम्हाला खरे वाटते, पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, त्यांचा हा घोर अपमान आहे, असे शरद पोंक्षे म्हणाले होते. त्यानंतर, काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता, पोंक्षे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीनंतर ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

पोंक्षे यांनी आपल्या ट्विटमध्ये कुठेही शिवसेनेचं नाव घेतलं नाही. मात्र, शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीचं टायमिंग साधत टिकात्मक ट्विट केलं. आजचा निर्णय बघून मा.शिंदेसाहेबांसोबत जाण्याचा निर्णय किती योग्य होता.ह्याचा आनंद होत आहे. विनाशकाले विपरीतबुद्धी... असे ट्विट करत पोंक्षे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, ही युती त्यांना अजिबात रुचली नसल्याचंही दिसून येतंय.

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती

महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारी मोठी घडामोड दिसून आली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. दरम्यान, यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे जोरदार टोला लगावला.

टॅग्स :शिवसेनाशरद पोंक्षेसंभाजी ब्रिगेड