Join us  

शरद पवारांची कार्यालयात बैठक अन् सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 2:44 PM

शरद पवारांनी रविवारी राष्ट्रवादी कार्यालयात मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांची बैठक बोलावली होती.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, पक्षाचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीतच हा राडा झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांच्या व्यक्तीगत वादामधून कार्यकर्त्यांमध्ये ही बाचाबाची झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे काही काळ कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

शरद पवारांनी रविवारी राष्ट्रवादी कार्यालयात मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांची बैठक बोलावली होती. येथील नेत्यांसोबत चर्चा करीत असताना, कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक राजकारणाच्या वादातून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. कार्यकर्ते एकमेकांना शिवीगाळ करत असतानाच ऐकमेकांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यावेळी तेथे हजर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची पांगापांग केली. 

लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभागातून राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. उस्मानाबाद, परभणी, बीड लोकसभा मतदारसंघात पक्षाचा बोलबाला असूनही लोकसभेत त्यांना अपयशच मिळाले. बीड जिल्ह्याठी पक्षाचे बंडखोर नेते जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षात फूट पडत भाजप-शिवसेना युतीला खुला पाठिंबा दिला. मराठवाड्यातील परभणी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा सांगण्यात येत होता. राजेश विटेकर येथून निवडून येतील, असेही सांगण्यात येत होते. मात्र, अंतर्गत गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसला. याबाबत एक फेसबुक पोस्ट करण्यात आली होती. या फेसबुक पोस्टवरील मजकुरावरुनच पक्षातील दोन गटांचे कार्यरकर्ते भिडल्याची माहिती आहे.  

टॅग्स :शरद पवारमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसपरभणी