Join us  

शरद पवारांचा ‘जबरा’ फॅन, 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडी सायकल’वारी’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 7:30 PM

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 80 वा वाढदिवस साजरा होत आहे.

मयूर गलांडे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांचे चाहते गाव-खेड्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील तरुणाईचा जल्लोष आणि पवारांबद्दलची क्रेझ देशानं पाहिली. 80 वर्षांचा योद्धा तरुण म्हणून शरद पवारांच्या दौऱ्यांच कौतुक झालंय. शरद पवारांनीही भरपावसात सभेला संबोधित करत, जवळपास 70-80 सभा घेऊन आपण तरुणांपेक्षाही कमी नसल्याचं दाखवलं. विशेष म्हणजे, स्वत: पवार यांनीही अनेक सभेत बोलताना, मी म्हातारा झालो नाही, मी तरुणच आहे, असे बोलूनही दाखवले. त्यामुळे पवारांची क्रेझ तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच असल्याचे दिसून येतंय. सध्या सोशल मीडियावर शरद पवारांच्या एका 62 वर्षीय चाहत्याचा फोटो व्हायरल होतो आहे.

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यासाठी, राष्ट्रवादीसह महाराष्ट्राच्या गाव-खेड्यातून त्यांना शुभेच्छा देण्याची तयारी सुरू आहे. शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गावागावात डिजिटल फलक उभारण्यात येतात, पेढे वाटून आणि विविध विधायक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची आणि नेतेमंडळींची मोठी गर्दीही होते. अवघ्या दोन दिवसांवर पवारांचा वाढदिवस येऊन ठेपला आहे. याच वाढदिनी निलंगा ते बारामती असा प्रवास करणाऱ्या पवारांच्या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

अब्दुल गनी खडके हे गेल्या 21 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडी असा सायकलवरून प्रवास करत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात. यंदाही ते नेहमीप्रमाणे काटेवाडी येथील पवारांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी निघाले आहेत. 62 वर्षीय अब्दुल गनी यांना गनी मामू म्हणून निलंग्यात ओळखले जाते. निलंग्यात, गनी मामू यांची विनाअनुदानित उर्दु शाळा आहे. इयत्ता 5 वी पर्यंत या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. जरी स्वत:ची उर्दु शाळा असली, तरी परिस्थितीने गनी मामा सर्वसामान्य आहेत. कारण, अद्यापही त्यांची शाळा विनाअनुदानितच आहे. शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा, असे या शाळेचे नाव आहे. गनी मामूंचा हा शुभेच्छा सायकल प्रवास 1998 पासून सुरू असून यंदा 22 वे वर्ष आहे. गेल्या 22 वर्षांच्या कालावधीत केवळ गेल्यावर्षी एकदाच, म्हणजे 2018 साली शरद पवारांची त्यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळी, पवार यांनी त्यांचं मनापासून स्वागतही केलं होतं, अशी आठवण त्यांचे मित्र सुधीर मसलगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

शरद पवारांविषयी गनी मामूंचे असलेले प्रेम निलंगा तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात चर्चीले जाते. निलंगा ते काटेवाडी हा तब्बल 300 किमीचा प्रवास ते करण्यासाठी ते दरवर्षी उत्सुक असतात. प्रत्येक वर्षी 7 डिसेंबरला गनी मामू सकाळी 7.30 वाजता निलंगा शहरातील शिवाजी चौकातून महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, वंदन करून प्रवासाला सुरुवात करतात. यंदाही त्यांना पाठवण्यासाठी निलंगा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुधीर मसलगे धम्मा काळे अंगद जाधव सुग्रीव कांबळे जीवन तेलंग माधवराव पौळ गफार लालटेकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. 

शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाचा मोठा प्रभाव गनीमामू यांच्यावर आहे. शरद पवारांनी स्थापन केलेल्या एस काँग्रेसपासून ते पवारांचे निष्ठावंत समर्थक आहेत. विशेष म्हणजे निलंग्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवातही गनी मामू यांच्यापासूनच झाली. गनी मामू हे तेव्हाही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच होते अन् आजही कार्यकर्तेच आहेत. नेतेपदाचा हव्यास किंवा लोभ कधीही त्यांना झाला नाही. कुठल्याही अपेक्षेशिवाय ते शरद पवारांना आपलं दैवत मानतात, असेही गनी मामूंचे मित्र सुधीर मनसले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवारांचा वाढदिवस, अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त बळीराजाला समर्पित करण्याचे ठरले आहे. त्यामुळे शुभेच्छुकांनी शरद पवार यांच्या सन्मानार्थ सोबत पुष्पगुच्छ किंवा हार आणणे टाळावे. त्याऐवजी स्वयंप्रेरणेने त्या खर्चाच्या निधीचे 'कृषी कृतज्ञता कोषा'साठी योगदान द्यावे, असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

टॅग्स :मुंबईशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसलातूरनिलंगा