Join us  

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार, दोन दिवसांचा पाहणी दौरा करणार

By महेश गलांडे | Published: October 17, 2020 10:43 AM

सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ शेअर करत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राता कहर केला असून वरुणराजा आता बास रे... अशी म्हणण्याची वेळ बळाराजावर आलीय. शेतात कापणीला आलेली उभी पीकं पाण्याखाली गेली आहेत.

मुंबई - परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. पुणे जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने चौघे मरण पावले. सोलापुरात १४ जणांचा बळी गेला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मराठवाडा दौरा होणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर माजी कृषीमंत्री लवकरच पोहोचणार आहेत., 

सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ शेअर करत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. 'मुख्यमंत्रीजी, घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल, अशी फेसबुक पोस्ट करत बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. मात्र, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार हे दौऱ्यावर जाणार आहेत. 

शरद पवार दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, आणि उस्मानाबाद या भागांना भेटी देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 18 व 19 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांचा हा पाहणी दौरा असणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना शरद पवार यांच्या दौऱ्यातून काहीतरी हाती लागेल, अशी अपेक्षा आहे.   

परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राता कहर केला असून वरुणराजा आता बास रे... अशी म्हणण्याची वेळ बळाराजावर आलीय. शेतात कापणीला आलेली उभी पीकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचे मोठं नुकसान झालंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. प्राथमिक अंदाजानुसार २३ जिल्ह्यांमधील काढणीवर आलेल्या साडेचार लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तूर, भात यांच्यासह कापसाचेही नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. 

धामणगावात दोघांनी संपविले जीवनधामणगाव रेल्वे (अमरावती) : दोन वर्षांपासून नापिकीचा सामना केल्यानंतर यंदा हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पिक अतिवृष्टीने नेस्तनाबूत झाल्याने आलेल्या निराशेपोटी दोन युवा शेतकºयांनी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोरगाव निस्ताने व उसळगव्हाण येथे घडली. प्रीतम भास्करराव ठाकरे (३०, रा. बोरगाव निस्ताने) व दीपक प्रमोद डफळे (२५, उसळगव्हाण), अशी मृतांची नावे आहेत. ठाकरे यांच्या शेतात पाणी साचल्याने कपाशी पीक पिवळे पडले. शेतीकर्ज कसे फे डायचे, या विवंचनेत त्यांनी घरी गळफास घेतला. तर डफळे यांनी विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रेचा अंत केला.

लातुरात दोघांनी केला अंतवाढवणा बु़ (जि़ लातूर) : निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील परमेश्वर नागनाथ बिरादार (वय ३४) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अतिवृष्टीने सोयाबीन खराब झाल्याने नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. तर सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त झालेल्या ६८ वर्षीय शेतकºयाने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. गोपिनाथ ग्यानोबा मद्देवाड (रा़ वाढवणा खु़, ता़ उदगीर) असे त्यांचे नाव आहे़

हिंगोलीत तरुणाने घेतले विषसेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील लिंबाळा तांडा येथील ३२ वर्षीय तरूणाने अतिवृष्टीच्या नैराश्यातून आत्महत्या केली. विजय बन्सी आडे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. विजय आडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. या नैराश्यात बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी विष प्राशन केले, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशेतकरीपूर